जळगाव - येथील जिल्हा रुग्णालयात आज सकाळपासून आरोग्य तपासणीसाठी परप्रांतीयांची मोठी गर्दी उसळली आहे. एकाच वेळी शेकडो लोक एकत्र आल्याने रुग्णालय प्रशासनाची देखील डोकेदुखी वाढली. रुग्णांच्या तपासणीसाठी कोणत्याही प्रकारची सक्षम उपाययोजना केलेली नसल्याने यावेळी 'सोशल डिस्टन्सिंग'चा बोजवारा उडाल्याचे धक्कादायक चित्र पाहायला मिळाले. दरम्यान, तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेता रुग्णालयातील डॉक्टर्स आणि नर्स यांना स्वतःच्या आरोग्याची काळजी वाटू लागली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विविध ठिकाणी अडकून पडलेले मजूर, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांना आपापल्या घरी परतण्यास अटी व शर्तीनुसार मुभा दिली आहे. यामुळे नागरिकांच्या स्थलांतराचे प्रमाण वाढले आहे. याच पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्याच्या हद्दीतून प्रवास करणाऱ्या नागरिकांना ठिकठिकाणी अडवून त्यांच्याकडे सक्षम अधिकाऱ्याने दिलेली परवानगी आहे का? याची चौकशी केली जात आहे. जळगाव जिल्ह्यातून विनापरवानगी वाहनाद्वारे किंवा पायी प्रवास करणाऱ्यांना अडवून आरोग्य तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात येत आहे. सोमवारी सकाळी अशाच प्रकारे शेकडो परप्रांतीय जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. एकाच वेळेस मोठ्या संख्येने नागरिक एकत्र आल्याने मोठा गोंधळ उडाला होता. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र होते.
जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या परप्रांतियांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. हे लोक एकमेकांच्या शेजारी तपासणीसाठी उभे होते. एकाच वेळी मोठ्या संख्येने नागरिक एकत्र आल्याने रुग्णालयातील सुरक्षारक्षकांची देखील तारांबळ उडाली. कोणीही ऐकून घेत नसल्याने प्रचंड गोंधळ उडाला होता. पोलीस दाखल होऊनही गर्दी नियंत्रणात येत नव्हती. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेबाबत कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना केलेल्या नसल्याचे या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आले आहे. या विषयासंदर्भात जिल्हा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याविषयी प्रतिक्रिया देण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. जळगाव जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी दाखल होणाऱ्या कोरोना संशयित रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येत असल्याचे दिसून येत आहे.