जळगाव - महिला व युवतींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना अतिशय दुर्दैवी आहेत. अशा घटनांना बळी पडलेल्या पीडितेसह तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय अनुसूचित आयोगाच्या माध्यमातून आपण प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही राष्ट्रीय अनुसूचित आयोगाचे सदस्य सुभाष पारधी यांनी दिली. ते शुक्रवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले होते. या दौऱ्यावेळी त्यांनी अजिंठा शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.
पत्रकार परिषदेच्या पूर्वी सुभाष पारधी यांनी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, अनुसूचित आयोग कार्यालयाच्या सहायक निदेशक अनुराधा दुसाने, समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील उपस्थित होते.
जळगाव जिल्ह्यातील दोन पीडित कुटुंबांना अर्थसहाय्य -
यावेळी बोलताना सुभाष पारधी यांनी सांगितले की, मी नुकताच राष्ट्रीय अनुसूचित आयोगाचा सदस्य झालो आहे. नियुक्ती झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील दोन अत्याचाराच्या घटना समोर आल्या. त्यामुळे लागलीच जळगाव जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यात दोन्ही पीडित कुटुंबांशी चर्चा करून, त्यांना धीर दिला. त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. सोबतच त्यांना आर्थिक मदतीचा धनादेश देखील दिला. जामनेर तालुक्यातील मालदाभाडी येथे अत्याचारग्रस्त पीडितेने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तिच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना शासनातर्फे मदतीचा 4 लाख 12 हजार 500 रुपयांचा धनादेश दिला. या प्रकरणातील संशयितांवर कारवाई करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथे मध्यप्रदेशातील एका अल्पवयीन युवतीवर अत्याचाराची घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपीला कठोर शासन व्हावे, म्हणून पोलीस अधीक्षकांची चर्चा केली. तसेच तिच्या कुटुंबीयांना देखील दोन लाख रुपयांचा आर्थिक मदतीचा धनादेश दिल्याची माहिती सुभाष पारधी यांनी काल दिली.
हेही वाचा - कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. पी. पाटील यांचा राजीनामा
टोळीच्या घटनेबाबत घेतला आढावा -
यावेळी सुभाष पारधी यांनी पारोळा तालुक्यातील टोळी येथे घडलेल्या अत्याचाराच्या घटनेबाबतही आढावा घेतला. त्याबाबत पोलीस अधीक्षकांना योग्य त्या कारवाईचे आदेश दिले. या घटनेतील पीडित कुटुंबाचे पुनर्वसन करण्यासह त्यांना घरकुल व इतर योजनांचा लाभ मिळवून देण्याबाबत देखील संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी निर्देश दिले.