जळगाव - आजवर आपण पैसे, दागिने, मोबाईल चोरीला गेल्याचे ऐकलं असेल. परंतु, शिरसोली गावात भलताच प्रकार घडला आहे. याठिकाणी चोरट्यांनी चक्क स्मशानभूमीतून अस्थी चोरल्या आहेत. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर मृताचे नातेवाईक आणि पोलीस अवाक झाले आहेत.
शिरसोली येथील सखुबाई झिपरू धनगर यांचे दोन दिवसांपूर्वी निधन झाले. निधनानंतर त्यांच्यावर रितीरिवाजनुसार 'मोक्ष धाम' स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारानंतर तिसऱ्या दिवशी त्यांचे नातेवाईक अस्थी संकलनासाठी स्मशानभूमीत गेले. यानंतर अस्थी विसर्जनाचे संस्कार पार पडणार होते.
हेही वाचा - जळगाव जिल्हा उपकारागृहातच कैद्यावर प्राणघातक हल्ला; जुन्या वादातून तिघा कैद्यांकडून पत्र्याने वार
मात्र, नातेवाईक स्मशानभूमीत गेल्यानंतर त्यांना धक्काच बसला. स्मशानभूमीत सखुबाई यांच्या अस्थीच आढळून आल्या नाहीत. तसेच राख देखील उचलून झाडण्यात आल्याचे समोर आले. हा प्रकार जाणीवपूर्वक केल्याचे समजते. परंतु, अद्याप यामागील कारण अस्पष्ट आहे. सखुबाई यांच्या नातेवाईकांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली; आणि तक्रार दाखल केली. सध्या पोलीस पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा -जो आडवा येईल, त्याला पाणी पाजणार - गुलाबराव पाटील
जादूटोणा करणारे काही लोक अंधश्रद्धेतून असे प्रकार करतात किंवा अंत्यसंस्कार केल्यानंतर अस्थींमध्ये मृताच्या अंगावरील सोने सापडते. त्यामुळे देखील असे प्रकार घडल्याचा इतिहास आहे. परंतु पोलीस तपास सुरू असल्याने यामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे.