जळगाव - महानगर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या जोरदार धुसफूस सुरू आहे. पक्षांतर्गत कुरघोड्या आणि स्थानिक नेतेमंडळीकडून राजकारण होत असल्याचा आरोप करत महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्षांकडे पाठवला. याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. अभिषेक पाटील यांच्यानंतर वेगवेगळ्या 12 फ्रंटल अध्यक्षांसह 300 कार्यकर्त्यांनी एकाच वेळी राजीनामे दिले असून, हा राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा 'सेट बॅक' मानला जात आहे.
- पदोन्नती की पंख छाटणी?
कुरघोडीच्या राजकारणाला कंटाळून महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी आपला राजीनामा थेट पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पाठवला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली. पक्षाने पाटील यांची प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करायचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, म्हणून प्रदेशकडून सूचित केले होते. अभिषेक पाटील हे महानगराध्यक्ष म्हणून उत्तमप्रकारे काम करत असताना त्यांना दूर करू नये, महानगराध्यक्ष म्हणून कायम ठेवावे, अशी मागणीही काही नेत्यांकडून करण्यात येत होती. मात्र, तरीही वरिष्ठ नेत्यांकडून ठोस भूमिका घेतली जात नसल्याने वैतागून अभिषेक पाटील यांनीच आपल्या पदाचा राजीनामा दिला. पक्षाने त्यांना प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्त करताना विश्वासात घेतलेले नाही. मग ही पदोन्नती आहे की पंख छाटणी? असा सवालही उपस्थित केला जात आहे. स्थानिक नेत्यांकडून वारंवार होणाऱ्या तक्रारींमुळे आपल्याला काम करता येत नाही, असाही थेट आरोप पाटील यांनी केल्याने पक्षातील 'भाऊबंदकी' चव्हाट्यावर आली आहे.
- 12 फ्रंटल अध्यक्षांचे सामूहिक राजीनामे-
अभिषेक पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर पक्षाच्या 12 फ्रंटल अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. यामध्ये उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष कल्पना पाटील, युवक अध्यक्ष स्वप्निल नेमाडे, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष जितेंद्र चांगरे, पदवीधर विभागाचे अध्यक्ष अनिल पाटील, सचिव ऍड. कृणाल पवार, युवक कार्याध्यक्ष तुषार इंगळे, विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष अक्षय वंजारी, युवती अध्यक्षा आरोही नेवे, वक्ता सेलचे अध्यक्ष रमेश भोळे, सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष गौरव लवंगले, ओबीसी सेलचे अध्यक्ष कौशल काकर, शिक्षक आघाडीचे प्रमुख हेमंत सोनार यांचा समावेश आहे.
हेही वाचा - Mumbai Nirbhaya Case : घटना निंदनीय, फास्ट ट्रॅकवर खटला चालवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
- खडसे गटाच्या पुनर्वसनासाठी अभिषेक पाटलांचा बळी?
अभिषेक पाटील यांच्या जागी एकनाथ खडसे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले अशोक लाडवंजारी यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशानंतर त्यांच्या समर्थकांच्या पुनर्वसनासाठी पक्षात अशाप्रकारे फेरबदल होत असून, त्याला काही स्थानिक नेतेमंडळीचे पाठबळ असल्याचा आरोप केला जात आहे. अभिषेक पाटील यांना बाजूला करण्यासाठी, ते पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या सूचना ऐकत नाहीत, त्यांना अंधारात ठेऊन निर्णय घेतात, अशा प्रकारच्या तक्रारी प्रदेश पातळीवर पद्धतशीरपणे पोहचवण्यात आल्याचेही बोलले जात आहे. खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर पक्षसंघटना मजबूत होईल, असे अपेक्षित होते. परंतु, पक्षसंघटना गटातटात विभागल्याचे पाहायला मिळत आहे.
- आक्रमक चेहरा म्हणून मिळवली होती ओळख-
2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अभिषेक पाटील हे जळगाव शहर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते. निवडणुकीच्या 15 दिवस आधी त्यांना अचानक उमेदवारीच्या सूचना देण्यात आल्या. ही निवडणूक ते हरले. मात्र, त्यानंतर जळगाव शहर मतदारसंघात त्यांनी पक्षसंघटन वाढीसाठी प्रयत्न केले, हे नाकारता येणार नाही. महापालिका, नागरी समस्येवर अनेक आंदोलने त्यांनी आक्रमकपणे करून पक्ष चर्चेत ठेवला. त्यांना आक्रमक चेहरा म्हणून ओळख मिळत असतानाच स्थानिक नेत्यांच्या राजकारणाचे ते बळी ठरले आहेत.
- पक्षश्रेष्ठींची जळगावकडे पाठ-
एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत जळगावात मोठा मेळावा होणार होता. मात्र कोरोनामुळे या मेळाव्याला मुहूर्त मिळाला नाही. त्यानंतर पक्ष संघटनेचा आढावा घेण्यासाठी पक्षश्रेष्ठी जळगावात आलेले नाहीत. आता नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे जळगाव जिल्ह्याचा दौरा करणार असल्याची चर्चा होती. परंतु, अद्यापही हा दौरा निश्चित झालेला नाही. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी जळगावकडे पाठ फिरवली आहे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या पक्षात सुरू असलेली धुसफूस पाहता पक्षश्रेष्ठींनी दौरा करावा, असेही काही कार्यकर्त्यांचे मत आहे.
हेही वाचा - गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा राजीनामा; मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत 'ही' आहेत नावे