जळगाव - मनोहर पर्रीकर हे राफेल प्रकरणाचे पहिले बळी ठरले आहेत, या वक्तव्यावरून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडवर चौफेर टीक झाली होती. त्यानंतर आव्हाड यांनी आज पुन्हा जळगावात मनोहर पर्रिकरांच्या विषयावरून भाजपला लक्ष्य केले. स्वादुपिंडाच्या कर्करोगाने ग्रस्त असलेल्या पर्रिकरांवर वैद्यकीय उपचार सुरू असतानादेखील भाजपने त्यांना ताणतणावापासून का दूर ठेवले नाही, त्यांच्यापासून मुख्यमंत्रीपद का काढून घेतले नाही, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी जळगावात आले होते. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, की कोणत्याही आजाराचे मूळ हे ताणतणाव असते असे डॉक्टरदेखील सांगतात. आजारी माणसाला आराम करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. पर्रिकरांना देखील आरामाची गरज होती. कोणत्या मुलाला वाटेल की, माझ्या वडिलांनी आजारी असताना तेही नाकाला नळी आणि दोन माणसे त्यांना धरून नेतील, अशा अवस्थेत कामावर जावे. अशा स्थितीत मुलगा म्हणून आपल्याला वडिलांची सेवा कराविशी वाटेल. तरीही भाजपने त्यांना ताणतणावातून मुक्त ठेवले नाही. त्यांना ताणतणावापासून अलिप्त अमेरिकेत किंवा इतरत्र ठेवायला हवे होते, असे आव्हाड म्हणाले.
तुम्ही इतिहास बघा, या देशात भाजपमधून अडवाणींविरोधात बोलणारा पहिला माणूस कोण असेल तर ते मनोहर पर्रिकर होते. अडवाणींना बाजूला करा, असे सांगणारे देखील कोण तर पर्रीकर होते. ते कधीच कोणाचे ऐकायचे नाहीत. ते प्रचंड हुशार होते. आयआयटीतून त्यांनी शिक्षण घेतले होते. ते नेहमी वाचन करायचे. रिकाम बसणे त्यांना पसंत नव्हते. जी पुस्तके तुम्ही-आम्ही लहानपणी वाचली, ती पुस्तके ते आता वाचायचे पण सतत वाचत रहायचे. मोदी देशाचे पंतप्रधान व्हावेत, असे सांगणारे देखील पर्रीकरच होते. मग अस अचानक काय झालं की त्यांना केंद्रातून थेट राज्यात परत येण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. या बद्दल आपण काहीच विचारायचे नाही का, चर्चा करायची नाही का, यात राष्ट्रद्रोह कुठे आला, असे विविध प्रश्नही जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केले.