जळगाव - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट ( Offensive posts man beaten jalgaon ) टाकणाऱ्या एका व्यक्तीस शिवसैनिक व महिला पदाधिकाऱ्यांनी खानदेश सेंट्रल मॉल परिसरात चोप दिला. धरणगाव येथील एका व्यक्तीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याने संतप्त झालेले शिवसैनिक व महिला पदाधिकारी यांनी जळगावात सेंट्रल मॉल परिसरात या व्यक्तीचा शोध घेऊन त्याला चांगलेच चोपले.
हेही वाचा - Two Youth Died in Accident : अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू
हेमंत दुधिया असे आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान, दुधियाला चोप दिल्यानंतर शिवसैनिकांनी त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. हा प्रकार काल सायंकाळी घडला आहे. हेमंत दुधियाने सोशल मीडियावरील जळगाव शहराच्या एका ग्रुपवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकली. या पोस्टमुळे शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट पसरली.
अखेर मागितली माफी : ही पोस्ट सोशल मीडियावर टाकल्यानंतर हेमंत दुधिया शहरातील आयनॉक्स थिएटरला 'मिशन काश्मीर' चित्रपट पाहण्यासाठी आला होता. शिवसैनिकांनी त्याच्यावर पाळत ठेवत थिएटरसमोर त्यास बेदम मारहाण करत पोस्ट टाकल्याचा निषेध व्यक्त केला. हेमंत दुधिया याने, माझ्याकडून चुकीची पोस्ट टाकली गेली म्हणत त्याबद्दल माफी मागतो, असे वक्तव्य केल्यामुळे त्यास सोडून देण्यात आले. मुख्यमंत्री यांच्या विरोधात पोस्ट टाकली जाईल त्यांना असा जाहीर चोप दिला जाईल, असेही यावेळी शिवसैनिकांनी सांगितले.
याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगराध्यक्ष शरद तायडे, महिला जिल्हाध्यक्षा शोभा चौली, सरीता माळी यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा - Bhusawal Fire News : भुसावळमध्ये अपार्टमेंटमधील घराला मध्यरात्री लागली आग; अग्नीतांडवात वडिलांचा मृत्यू