जळगाव - जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरामध्ये महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्रा बंदला गालबोट लागले. महाविकास आघाडी व भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने हाणामारी झाली. त्यात काही जण जखमी झाले आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला. दरम्यान, या संदर्भात अजूनपर्यंत वरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार नसल्याने गुन्हा दाखल झालेला नाही.
'या' कारणामुळे उद्भवला वाद-
उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरी येथे आंदोलक शेतकऱ्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडी सरकारच्यावतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्यानुसार वरणगाव शहरातही महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे कार्यकर्ते बाजारपेठेत फिरून व्यापाऱ्यांना बंद पाळण्याचे आवाहन करत होते. यावेळी भाजपचे कार्यकर्ते मात्र, व्यापाऱ्यांना बंद पाळू नका, असे सांगत होते. याच कारणावरून वादाची ठिणगी पडली आणि तणाव निर्माण झाला. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने शाब्दिक वाद वाढून थेट हाणामारी झाली.
शिवसेना-राष्ट्रवादीकडून हाणामारी झाली नसल्याचा दावा -
या घटनेसंदर्भात शिवसेनेचे ग्राहक संरक्षण कक्षाचे उपजिल्हाप्रमुख नितीन देशमुख व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी यांनी बाजू मांडली. ते म्हणाले की, आज उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे शेतकरी आंदोलकांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्यावतीने महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता. त्यानुसार तीनही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते बाजारपेठेत शांततेच्या मार्गाने व्यापाऱ्यांना बंद पाळण्याचे आवाहन करत होते. परंतु, त्याच वेळी भाजपचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे व त्यांचे काही सहकारी हे बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना भडकवण्याचे काम करत होते. त्या ठिकाणी महाविकास आघाडी व भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने शाब्दिक वाद झाला. मात्र, मारहाण झाली नाही. भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला मारहाण झाल्याचा खोटा आरोप केला आहे. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी हा स्टंट केला आहे, असा आरोप देशमुख व चौधरी यांनी केला.
महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा भाजपाचा आरोप -
भाजपाचे शहराध्यक्ष सुनील माळी व भाजप कार्यकर्ते गजानन वंजारी यांनी भाजपची बाजू मांडताना सांगितले की, आज महाविकास आघाडीच्यावतीने महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता. मात्र, गेल्या दीड ते दोन वर्षांपासून कोरोनामुळे व्यापारीवर्ग हवालदिल झालेला आहे. महाविकास आघाडीचे कार्यकर्ते दादागिरी करत दुकाने बंद करत असल्याची तक्रार काही व्यापाऱ्यांनी आमच्याकडे केली होती. त्यानुसार आम्ही दहा-बारा कार्यकर्ते बाजारपेठेत व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्याचे शांततेच्या मार्गाने आवाहन करत होतो. त्याच वेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आमच्यावर थेट हल्ला केला. भाजपचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे, डॉ. साजीद, शंकर पवार यांना जमावाने बेदम मारहाण केली, असा दावा माळी व वंजारी यांनी केला.
दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते रुग्णालयात -
या घटनेनंतर दोन्ही बाजूचे काही कार्यकर्ते रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत तक्रार नसल्याने कोणावरही गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती वरणगाव पोलिसांनी दिली.
हेही वाचा - Maharashtra Bandh : शेतकऱ्यांची हत्या करणाऱ्यांना हा ढोंगीपणाच वाटणार, नाना पटोलेंचा फडणवीसांवर पलटवार