जळगाव - केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी रविवारी जळगावात लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागासह सातपुड्यातील दऱ्या खोऱ्यातील शेकडो गावागावात लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने किसान बचाव आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी सरकारविरोधात निदर्शने करत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याची आग्रही मागणी केली.
९ ऑगस्ट, ऑगस्टक्रांती दिवसाचे औचित्य साधत देशभरातील किसान आंदोलकांनी मिळून राष्ट्रीय पातळीवर संघटीत झालेल्या अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने रविवारी शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आले. 'किसान बचाव कॉर्पोरेट भगाव'चा नारा देत देशव्यापी किसान आंदोलनाची हाक दिली होती. त्याप्रमाणे लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने चोपडा, यावल, रावेर, भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड, अमळनेर, पारोळा, चाळीसगाव व जळगाव तालुक्यातील आदिवासी व ग्रामीण भागातील गावागावांत कोरोनाचे नियम पाळत आंदोलन केले.
शेती आणि आपल्या जल, जंगल, जमीन या नैसर्गिक संसाधनांवरचे हक्क राखण्यासाठी केंद्र सरकारने शेती व आदिवासींच्या विरोधात केलेल्या कायद्यातील बदलांचा निषेध करत हे कायदे रद्द व्हावेत, यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.
या मागण्यांसाठी झाले आंदोलन -
शेतकऱ्यांना त्वरित कर्जमुक्त करा, शेतीमालाला दीडपट हमीभाव द्या, शेतकरी व आदिवासींच्या विरोधात काढलेले अध्यादेश तत्काळ मागे घ्या, शेतकऱ्याचे वीजबिल माफ करत वीज सुधारणा बिल २०२० मागे घ्या, डिझेलच्या किंमती कमी करा, कोरोना काळात शेतकरी व कष्टकरीवर्गाला पूर्ण रेशन द्या, दुधाला हमीभाव वाढवून द्या, आदिवासींना त्यांनी दाखल केलेले दावे त्वरित निकाली काढून त्यांच्या शेतीचा अधिकार द्या, या सारख्या मागण्या घेवून आंदोलकांनी गावागावांमध्ये निदर्शने केली.