जळगाव - जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग काही केल्या आटोक्यात येत नसल्याची परिस्थिती आहे. आज (मंगळवारी) जिल्ह्यात तब्बल 956 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. चिंताजनक बाब म्हणजे, आजही 6 रुग्णांचा मृत्यू झाला. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढून 72 हजार 575 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे 1 हजार 455 जणांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव जिल्हा प्रशासनाला मंगळवारी रात्री 6 हजार 263 तपासणी अहवाल प्राप्त झाले. त्यात 956 बाधित समोर आले आहेत. मंगळवारी दिवसभरात 709 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे कोरोनावर मात केलेल्या रुग्णांचा एकूण आकडा 63 हजार 27 वर पोहोचला आहे. दरम्यान जिल्ह्यात सध्या 8 हजार 93 रुग्णांवर उपचार सुरू असून, यामध्ये 6 हजार 338 रुग्णांना लक्षणे नाहीत, तर 1 हजार 755 रुग्णांमध्ये लक्षणे आढळून आली आहेत. जिल्ह्यातील 5 हजार 204 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. तर 359 रुग्ण ऑक्सिजनवर असून, 246 रुग्णांवर आयसीयुमध्ये उपचार सुरू आहेत.
जळगावमध्ये सर्वाधिक रुग्ण
जळगाव शहरातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. जळगाव हे सद्यास्थितीत कोरोनाचे जिल्ह्यातील प्रमुख हॉटस्पॉट शहर आहे. मंगळवारी देखील जळगावात सर्वाधिक 341 बाधित रुग्ण आढळून आले. त्याखालोखाल भुसावळ तालुक्यात 117, चोपडा तालुक्यात 106, जामनेर तालुक्यात 72, चाळीसगावात 46 तर धरणगावात 58 कोरोबाधित रुग्ण आढळून आले आहेत.