जळगाव - जिल्ह्यातील पशुवैद्यकीय रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असल्याने शेतकर्यांची गैरसोय होत आहे. वेळेवर सेवा मिळत नसल्याने अनेक शेतकर्यांचे मोठे हाल होत आहे. एकंदरीत मोठ्या प्रमाणावर रिक्त पदांमुळे पशुसंवर्धन विभाग सलाईनवर असल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे. तब्बल 70 टक्के पदे रिक्त असून ती कधी भरली जातील? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात जवळजवळ 183 पशुवैद्यकीय रुग्णालये आहेत. मात्र,या ठिकाणी पाहिजे त्या प्रमाणात मनुष्यबळ नाही. डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त असल्याने शेतकऱ्यांना पाहिजे ती सेवा वेळेवर मिळत नसल्याचे चित्र आहे. पूर्णवेळ सेवा मिळत नसल्याने शेतकऱ्यांना साहजिकच खासगी डॉक्टरांचा आधार घ्यावा लागत असून नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
रात्री अपरात्री प्राण्याला किंवा घरातील पशूला काही दुखापत झाल्यास, आजार झाल्यास पशुवैद्यकीय रुग्णालयाचे डॉक्टर उपलब्ध होत नाही. त्यामुळे, खासगी डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावे लागतात. व नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.
जिल्हाभरातील पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदांमुळे पाहिजे ती पशूवैद्यकीय सेवा मिळत नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे, लवकरात लवकर रिक्त पदे भरावीत अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
पशुगणना २०१९- २०२० नुसार
पशुधन विकास अधिकारी
एकुण पदे - १०४
कार्यरत - ८४
रिक्त पदे - २०
सहाय्यक पशुधन विकास अधिकारी
एकूण पदे - ४१
कार्यरत - १६
रिक्तपदे - २४
पशुधन पर्यवेक्षक
एकूण पदे - ११०
कार्यरत - ६७
रिक्त - ४३
प्रणोपचारक
एकूण पदे - ७४
कार्यरत - ४९
रिक्त पदे - २५
टक्केवारी निहाय रिक्त पदांचा तपशील
पशुधन विकास अधिकारी - ७० टक्के
पशुधन पर्यवेक्षक - ५० टक्के
सहाय्यक पशुधन विकास अधिकारी - २५ टक्के
प्रनौपचारक - ३५ टक्के
मनुष्यबळ कमी असले तरी आहे त्या मनुष्यबळात पशुधनाच्या लसीकरणासह वेगवेगळी जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली जात आहे. रिक्त पदांसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला होता. त्यानुसार लवकरच जळगाव जिल्ह्याला २९ अधिकारी मिळतील.
अर्थसंकल्पात शासनाने शेतकऱ्यांसंबंधी विविध गोष्टींवर मोठ्या प्रमाणात तरतूद केली. शेतकऱ्यांच्या बाजूने सकारात्मक निर्णय सुद्धा घेण्यात आले. मात्र, आहे तीच व्यवस्था लंगडी असल्याने तिला बळकट करण्यासाठी आता शासन लक्ष देईल का? हे पाहावे लागेल.
हेही वाचा - Balshakti Award 2022 : जळगावच्या चिमुरडीला पंतप्रधानांच्या हस्ते बालशक्ती पुरस्कार