जळगाव - जिल्ह्यातील अमळनेर येथील लामा जिनिंगला आज सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत शेकडो क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, जिनिंग मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, ही आग कशामुळे लागली? याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.
अमळनेर शहरातील पिंपळे रस्त्यावर लामा जिनिंग आहे. यतीन कोठारी यांच्या मालकीची ही जिनिंग असून, सध्या या जिनिंगमध्ये शासकीय कापूस खरेदी केंद्र आहे. राज्य सरकारच्या निर्देशानुसार याठिकाणी कापूस खरेदी केली जात आहे. शेकडो क्विंटल कापूस खरेदी देखील झालेला आहे. रविवारी सकाळच्या वेळी या जिनिंगमधील कापसाला अचानक आग लागली. हवेमुळे आग क्षणातच भडकली आणि शेकडो क्विटंल कापूस जळून खाक झाला.
स्थानिक मजुरांनी घटनेची माहिती जिनिंग मालक कोठारी यांना दिली. त्यानंतर अमळनेर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या बंबांना पाचारण करण्यात आले. दरम्यान, या आगीत जिनिंगमध्ये मोकळ्या जागेत ठेवलेला शेकडो क्विंटल कापूस जळून खाक झाला आहे. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कापसाच्या अनेक गाठी देखील आगीत जळाल्या आहेत. आगीचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.