जळगाव- गेल्या ४ ते ५ दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पडत आहे. या पावसामुळे खरीप हंगामातील उडीद, मूग अशा कडधान्य पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. दरम्यान, अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून त्याचा अहवाल राज्य शासनाला सादर करावा, असे आदेश आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत.
पावसामुळे खरीप हंगामातील कापूस, ज्वारी, बाजरी तसेच मका पिकांना लाभ झाला आहे. मात्र, उडीद, मूग अशा कडधान्य पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तीळ पिकाचेही खूप नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील जळगाव, धरणगाव, एरंडोल, अमळनेर, चोपडा, भुसावळ, भडगाव, पाचोरा, जामनेर, रावेर, यावल तालुक्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे. संपूर्ण जिल्ह्यात दरवर्षी साधारणपणे एकूण लागवडीखालील साडेसात लाख हेक्टर क्षेत्रापैकी सुमारे ५० हजार हेक्टरवर कडधान्य पिकांची लागवड केली जाते. आता त्यापैकी सुमारे १५ ते २० हजार हेक्टरवरील कडधान्य पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात मूग पीक काढणीवर आलेले होते. परंतु, ४ ते ५ दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. शिवाय सूर्यदर्शनही झालेले नाही. अशा परिस्थितीत उडीद आणि मूग पिकाला फटका बसला आहे.
मुगाच्या शेंगांना कोंब फुटली आहेत. तर काही शेतकऱ्यांच्या शेतातील पिके पाणी साचल्यामुळे अक्षरशः सडून गेली आहेत. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा अतिवृष्टीमुळे हिरावला गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. शासनाने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून त्वरित आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. दरम्यान, अतिवृष्टीमुळे कडधान्य पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला तातडीने जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. नुकसानीचा अहवाल राज्य शासनाला सादर करावा, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. तसेच, राज्य शासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देऊ, असे आश्वासन गुलाबराव पाटील यांनी दिले आहे.
हेही वाचा- भाजपाने अगोदर त्यांचे आमदार सांभाळावेत; गुलाबराव पाटलांचा हल्लाबोल