जळगाव - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कर्मचारी भरतीचा मार्ग मोकळा झाला असून, संचालक मंडळाने अखेर कर्मचारी भरण्याचा निर्णय घेतला आहे. शासन मान्यता असलेल्या आयबीपीएस या एजन्सीमार्फत ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच जिल्हा बँकेमार्फत कर्मचारी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत कर्मचारी भरतीच्या विषयावर एकमताने निर्णय घेण्यात आला. बँकेच्या अध्यक्षा अॅड. रोहिणी खडसे-खेवलकर, उपाध्यक्ष आमदार किशोर पाटील, आमदार एकनाथ खडसे, आमदार सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे, माजी आमदार चिमणराव पाटील, माजी आमदार गुलाबराव पाटील, अॅड. रवींद्र पाटील, सुरेश बोरोले, तिलोत्तमा पाटील, गणेश नेहेते, अनिल पाटील, कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख आदींच्या उपस्थितीत कर्मचारी भरतीचा विषय मार्गी लावण्यात आला आहे. आयबीपीएस या एजन्सीला भरती प्रक्रियेचे काम देण्याचा ठराव देखील यावेळी करण्यात आला आहे.
लिपीक संवर्गातील २२५ पदे भरली जाणार-
आचारसंहिता संपल्यानंतर भरती प्रकियेला प्रारंभ होणार आहे. यात लिपीक संवर्गातील २२५ पदे भरली जाणार आहेत. १०० गुणांच्या परीक्षेत ९० गुणांची ऑनलाईन परीक्षा आणि १० गुणांची मुलाखत घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.