जळगाव- जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील धामणगाव येथील एका शेतकऱ्याची गेल्यावर्षी ऑनलाईन पद्धतीने दीड लाख रुपयांची फसवणूक झाली होती. या प्रकरणाचा उलगडा करण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणाचे कनेक्शन थेट झारखंड राज्यातील जामताडा जिल्ह्याशी निघाले आहे. 'जामताडा' हे ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या आर्थिक फसवणुकीचे केंद्रबिंदू मानले जाते. देशभरातील नागरिकांना गंडा घालणाऱ्या अनेक टोळ्या याठिकाणी सक्रिय असल्याचे बोलले जाते.
जळगावातील शेतकऱ्याला दीड लाखांचा गंडा घालणाऱ्या मजहर अन्सारी (वय 26) याला जळगाव सायबर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या प्राथमिक चौकशीत धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. जामताडा येथील अनेक अल्पशिक्षित तरुण हे ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या फ्रॉडमध्ये सहभागी आहेत. कमी श्रमात श्रीमंत होण्याच्या हव्यासपोटी जामताड्याचे तरुण अशा पद्धतीने गुन्हे करत असल्याची माहिती मजहरने पोलिसांना दिली आहे. आता पोलीस त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेत आहेत.
कमी व्याजदराने कर्जाचे आमिष पडले महागात
चाळीसगाव तालुक्यातील धामणगाव येथील नितीन आनंदराव निकम हे शेतकरी आहेत. संशयित आरोपी मजहर अन्सारी याने 24 ते 30 जुलै दरम्यान निकम यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क केला. तसेच आपण 'इंडियाबुल्स धनी' या फायनान्स कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. 3 लाख रुपयांचे कर्ज कमी व्याजदरात देण्याचे आमिष मजहर याने नितीन यांना दाखवले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून नितीन यांनी त्याला कर्जासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला. नंतर त्याने नितीन व त्यांच्या पत्नीचे आधारकार्ड, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे एटीएम कार्डचे फोटो मोबाईलवर व्हाट्सएपच्या माध्यमातून मागवून घेतले. नंतर कर्जाची रक्कम थेट बँक खात्यात जमा होणार असल्याचे सांगून नितीन यांच्या मोबाईलवर येणारे ओटीपी विचारून घेतले. व आरोपीने निकम यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यातून 1 लाख 59 हजार 701 रुपयांची रक्कम आपल्या खात्यावर वळती करून घेतली होती.
असा अडकला मजहर पोलिसांच्या जाळ्यात
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर नितीन निकम यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार जळगाव सायबर पोलिसांत 3 ऑगस्ट 2019 रोजी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर सायबर पोलिसांनी निकम यांचे कॉल डिटेल्स, बँकिंग ट्रान्झक्शन याची चौकशी केली. पण पोलिसांना सुरुवातीला कोणत्याही प्रकारचे पुरावे मिळाले नाहीत. त्यानंतर काही दिवसांनी निकम यांच्या खात्यातून ज्या वॉलेटवर पैसे वळाले होते, त्या वॉलेटमधून झालेल्या बँकिंग व्यवहाराचे कनेक्शन मिळाले. या वॉलेटवरून एका बँक खात्यात पैसे टाकण्यात आले होते. या बँक खात्याचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि निकम यांना आलेल्या फोन कॉलचे डिटेल्स मिळतेजुळते होते. हाच धागा पकडून सायबर पोलिसांनी त्या बँक खात्याच्या व्यवहारांवर काही महिने सतत नजर ठेवली. अखेर झारखंड पोलिसांच्या मदतीने पोलीस आरोपी मजहरपर्यंत जाऊन पोहोचले.
....म्हणून पोलिसांना सापडत नाही आरोपी
ऑनलाईन फ्रॉड करणारे आरोपी हे बनावट सीमकार्ड किंवा ईमेलद्वारे नागरिकांशी संपर्क साधतात. काहीतरी आमिष देऊन ते संबंधिताला आर्थिक व्यवहार करण्यास भाग पाडतात. सावज हेरल्यानंतर ते लगेचच संबंधित मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी बंद करतात. एखाद्याच्या बँक खात्यातून पैसे वळवण्यासाठी बनावट मोबाईल क्रमांकाचे यूपीआय आयडी वॉलेट बनवले जाते. याच वॉलेटमध्ये पैसे जमा होतात. किंवा त्या वॉलेटद्वारे आर्थिक व्यवहार होतात. पुढे या वॉलेटमधून बनावट माहितीच्या आधारे उघडलेल्या बँक खात्यात (करंट अकाऊंट) पैसे जमा होतात. हे सारे व्यवहार वेगवेगळे तरुण वेगवेगळ्या ठिकाणाहून करतात. त्यामुळे सायबर पोलिसांना ठोस पुरावे मिळत नाहीत. आरोपी सतत लोकेशन बदलत असल्याने पोलीस त्यांच्यापर्यंत पोहचत नाहीत. एखाद्या वेळी आरोपीकडून तांत्रिक चूक झाली आणि ती पोलिसांच्या नजरेत आली तरच आरोपी सापडतो. मजहर अशाच चुकीमुळे पोलिसांच्या तावडीत सापडला. त्याने यूपीआय वॉलेटमधून स्वतःच्या बँक खात्यात पैसे वळवल्याने तो पोलिसांना सापडला.
अशा प्रकारे सक्रिय असते रॅकेट
मजहरच्या चौकशीत पोलिसांना ऑनलाईन फ्रॉड करणारे रॅकेटचे काम कसे चालते? याची माहिती मिळाली. ऑनलाईन फ्रॉड करणाऱ्यांच्या रॅकेटमध्ये काही जण हे नागरिकांना बनावट मोबाईल क्रमांकावरून किंवा ईमेलद्वारे संपर्क करतात. एखाद्याशी संपर्क झाल्यानंतर त्याने सकारात्मक प्रतिसाद दिला की त्या व्यक्तीला आर्थिक व्यवहार करण्यास भाग पाडले जाते. नंतर तो मोबाईल क्रमांक आणि ईमेल डिस्कनेक्ट होतो. नंतर रॅकेटमधील दुसरे जण पैसे वळवणे, व्यवहार करणे यासाठी वॉलेट किंवा बँक खाते ऑपरेट करतात. वॉलेट आणि बँक खात्यात जमा होणारे पैसे तिसरी व्यक्ती एटीएममधून रोख स्वरुपात वेगवेगळ्या ठिकाणाहून काढते. नंतर हीच व्यक्ती रॅकेटमधील सर्वांच्या वेगवेगळ्या बँक खात्यात ती रक्कम जमा करते. हे व्यवहार दुसऱ्याच बँक खात्यातून होत असल्याने, पोलिसांना त्याची माहिती मिळत नाही. ही ऑनलाईन फ्रॉड करण्याची 'मोडस ऑपरेंडी' असल्याची माहिती मजहरने पोलिसांना दिली आहे.