जळगाव - फेसबुकवर एका २२ वर्षीय तरुणासोबत शहरातील ३४ वर्षीय विवाहितेची ओळख निर्माण झाली. त्यातून दोघांचे सुत जुळले. यानंतर पळून जात विवाहिता थेट उत्तरप्रदेशातून थेट नेपाळ बॉर्डरवर पोहोचली आहे. त्या तरुणासोबत ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये राहण्याचा निर्णय तिने घेतला. कुटुंबीयांसोबत पुन्हा घरी येण्यास नकार दिला. त्यामुळे हताश झालेले विवाहितेचे कुटुंबीय आणि पोलीस जळगावात माघारी परतले आहेत. या प्रकारामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
जळगाव शहरात राहणारी ही ३४ वर्षीय महिला आहे. तिला १४ वर्षांचा मुलगा आहे. गेल्या वर्षभरापूर्वी फेसबुकच्या माध्यमातून या महिलेची उत्तरप्रदेशातील एका २२ वर्षीय तरुणासोबत मैत्री झाली. दोघांच्या गप्पा वाढल्यानंतर सुत जुळले. एकमेकांसोबत राहून संसार करण्याचा निर्णय दोघांनी घेतला. यानंतर गेल्या वर्षी १५ ऑगस्ट २०१९ ला या महिलेने जळगाव सोडले. पत्नी हरवल्यामुळे तिच्या पतीने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली. तिचा मोबाईल दिल्ली येथे सुरू असल्याची तांत्रिक माहिती पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी मिळवली होती. यानंतर महिलेने मोबाईल देखील बंद केला होता. त्यामुळे महिलेचे अपहरण झाले की काय? या संशयातून जिल्हापेठ पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले.
अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, पोलीस उपअधीक्षक डॉ.निलाभ रोहन यांच्याकडे सर्व प्रकार सांगितला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे जिल्हापेठ पोलीस महिलेचे पती व मुलगा या दोघांसोबत १५ सप्टेंबर रोजी दिल्ली येथे गेले. महिलेच्या फेसबुक खात्यावरुन पोलिसांनी काही तांत्रिक माहिती, तेथील तरुणाचे फोटो मिळवलेले होते. याच आधारावर पोलिसांनी तपास सुरू केला. दिल्लीहून मुरादाबार, नैनीताल असा प्रवास केला. अखेर स्थानिक नागरिक व पोलिसांच्या मदतीने नैनीतालपासून काही अंतरावर नेपाळ देशाच्या सीमेजवळ एका छोट्या गावात महिला व तरुण मिळून आले. परंतु, तेथे पोहोचल्यानंतर संबंधित विवाहितेने पती, मुलासोबत पुन्हा जळगावात येण्यास नकार दिला. आपण आता याच तरुणासोबत ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये राहण्याचा निर्णय घेतल्याचे तिने सांगितले.
पत्नीचा हा निर्णय ऐकून तिच्या पतीने परत जळगावात येण्याचा निर्णय घेतला. आता हे प्रकरण काडीमोडपर्यंत येऊन पोहोचले आहे.