जळगाव - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू असतानाही जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने यावर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वितरित केली आहेत. मात्र, कोरोनामुळे शाळा सुरू नसल्याने केवळ पुस्तके मिळून उपयोग काय? असा सवाल ग्रामीण भागातील पालक वर्गाकडून उपस्थित केला जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय समोर आणला आहे. ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना हा पर्याय परवडणारा नाही. त्यामुळे पुस्तके तर मिळाली मात्र, शिक्षण सुरू नाही, अशी स्थिती जळगाव जिल्ह्यात आहे.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून 'सर्व शिक्षा अभियानां'तर्गत बालभारतीमार्फत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप केले जाते. दरवर्षी जून महिन्यात शाळा सुरू होऊन जातात, पण विद्यार्थ्यांना पुस्तके मिळत नसल्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडतात. मात्र, यावर्षी कोरोना महामारीच्या काळातही शिक्षण विभागाने योग्य नियोजन करत जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तके पोहचवली. जळगाव जिल्ह्यातील शाळांसाठी यावर्षी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने २५ लाख ६४ हजार ९५१ इतक्या पाठ्यपुस्तकांची मागणी शालेय शिक्षण विभागाकडे नोंदवली होती. त्यानुसार शालेय शिक्षण विभागाने पुस्तके उपलब्ध करून दिली. पुस्तके उपलब्ध झाल्यानंतर प्राथमिक शिक्षण विभागाने ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवली देखील. सद्यस्थितीत जळगाव जिल्ह्यात पहिली ते आठवीच्या १०० टक्के विद्यार्थ्यांना पुस्तके मिळाली आहेत. मात्र, कोरोनामुळे शाळाच सुरू नसल्याने पुस्तके मिळूनही विद्यार्थ्यांना शिक्षण मिळण्यास अडचणी येत आहेत.
आमच्या पोरांनी शिकायचे कसे?
१५ जूनपासून शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. मात्र, कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे शाळा प्रत्यक्षात सुरू झालेल्या नाहीत. शालेय शिक्षण विभागाचा ऑनलाइन शाळा सुरू करण्याचा खटाटोप सुरू आहे. ग्रामीण भागातील अडचणी लक्षात घेता लाखो विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून दूर आहेत. शिक्षण विभागाने यावर्षी वेळेत पाठ्यपुस्तके उपलब्ध केली असली तरी शाळाच सुरू नसल्याने या पुस्तकातून आमच्या पोरांनी शिकायचे कसे? असा प्रश्न ग्रामीण भागातील पालकांना पडला आहे. कोरोनामुळे शाळा बंद व ग्रामीण भागात न पोहचलेले ऑनलाइन शिक्षण यामुळे आमच्या पाल्यांचे भवितव्यच अंधारात सापडले असल्याच्या प्रतिक्रिया जळगाव तालुक्यातील आसोदा गावातील काही पालकांनी 'ई-टीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केल्या.
शासनाने शाळांसंदर्भात लवकर निर्णय घ्यावा-
शासन विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण कसे देणार आहे, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. शाळा अजूनही सुरू झालेल्या नाहीत. शाळांमध्ये विद्यार्थी नाहीत, त्यामुळे शिक्षणही नाही, अशा परिस्थितीत पुस्तकांचा काहीही उपयोग नाही. एकदा शिक्षक आले व पुस्तकांचे वाटप करून गेले. त्यानंतर पुन्हा ते शाळेत आले नाहीत. मुले स्वतःहून अभ्यास करत नाहीत. शाळा सुरू नसल्याने मुले उनाडक्या करत फिरत आहेत. शासनाने शाळांसंदर्भात लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही पालक व्यक्त करत आहेत.
ऑनलाइन शिक्षणासंबंधी नियोजन सुरू -
प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याबाबत राज्य शासनाकडून अद्याप स्पष्ट निर्देश नाहीत. कोरोनाचा प्रादुर्भाव जसा कमी होईल तसा ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात टप्प्याटप्प्याने शाळा सुरू होतील, असा अंदाज आहे. शाळा बंद असल्या तरी शिक्षण थांबायला नको म्हणून शासनाने मांडलेल्या ऑनलाइन एज्युकेशनच्या संकल्पनेवर काम सुरू असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी बी. एस. अकलाडे यांनी 'ई-टीव्ही भारत'शी बोलताना सांगितले. जिल्ह्यातील 15 तालुक्यांमध्ये कोरोनाची स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन ऑनलाइन शिक्षण देण्यासाठी काय करता येईल? याबाबत मुख्याध्यापक, शालेय व्यवस्थापन समितीकडून सूचना मागावल्या आहेत. ग्रामीण भागात असणाऱ्या वीज, नेटवर्कच्या अडचणी, पालकांकडे नसलेले अँड्रॉईड मोबाईल, संगणक या गोष्टींवर देखील विचार सुरू आहे. जवळपास सर्वच लोकांकडे साधे मोबाईल फोन आहेत. त्यामुळे अँड्रॉईड मोबाईल, संगणकाऐवजी ग्रुप कॉलिंगकरून विद्यार्थ्यांना गटागटाने शिकवता येईल का? याचाही विचार सुरू आहे. यासाठी त्या-त्या गावातील इच्छुक पालक, स्वयंसेवक तसेच शालेय व्यवस्थापन समितीची मदत घेण्यात येणार आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील भुसावळ आणि चोपडा या दोनच तालुक्यांमध्ये या गोष्टीवर काम सुरू आहे. याठिकाणी हा प्रयोग यशस्वी झाला, तर टप्प्या-टप्प्याने संपूर्ण जिल्ह्यात तो राबवला जाईल, असे देखील शिक्षणाधिकारी अकलाडे यांनी सांगितले.