जळगाव - जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी शुक्रवारी ३ जानेवारीला निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बुधवारी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची अजिंठा विश्रामगृहात बैठक झाली. बैठकीनंतर सेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष महाविकास आघाडीचाच होणार असल्याचा दावा पत्रकारांशी बोलताना केला. दरम्यान, या निवडणुकीसाठी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी आपल्या सदस्यांसाठी व्हीप जारी केला आहे.
अजिंठा विश्रामगृहात झालेल्या बैठकीला मंत्री गुलाबराव पाटील, शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, आमदार चिमणराव पाटील, किशोर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील, माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ आदी उपस्थित होते. बैठकीत जि. प. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसंदर्भात आवश्यक संख्याबळ जुळवण्याबाबत चर्चा झाली. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीबाबत हमखास यश मिळणार असल्याचा दावा यावेळी महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी केला.
हेही वाचा - माझ्या वडिलांमुळेच पुण्यातील काँग्रेस भवन वाचलं, नाहीतर इथं....
बैठक संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना गुलाबराव पाटील यांनी सांगितले, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सर्व सदस्य एकत्रित असल्याने ३ रोजी नक्कीच आम्ही केलेला दावा खरा ठरणार आहे. सध्या संख्याबळ दिसत नसले तरी योग्यवेळ आल्यावर ते आमच्याकडे उपलब्ध होईल, असाही दावा गुलाबराव पाटील यांनी केला. तसेच जि. प. असो किंवा पंचायत समितीची निवडणूक, आता सर्वच निवडणुका या महाविकास आघाडी सोबतच लढविण्यात येतील, असेही पाटील यांनी सांगितले.
काँग्रेसचा व्हीप जारी -
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी शुक्रवारी निवडणूक होत आहे. यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना यांची महाविकास आघाडी निश्चित झाली आहे. बुधवारी काँग्रेसकडून पक्षाच्या चारही सदस्यांना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील यांनी पक्षाच्या वतीने पक्षादेश (व्हीप) बजाविला आहे. यात प्रभाकर नारायण सोनवणे, अरुणा पाटील, दिलीप युवराज पाटील, सुरेखा नरेंद्र पाटील यांचा समावेश आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या आदेशावरून हा पक्षादेश बजावण्यात आला आहे. यात जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी होणाऱ्या बैठकीमध्ये आपण उपस्थित राहून अध्यक्षपदाचे उमेदवार जयश्री अनिल पाटील यांना मतदान करावे.
हेही वाचा - ठाकरे सरकारचे खातेवाटप लवकरच.. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठका सुरूच
या व्हीपचे उल्लंघन केल्यास आपण महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम १९८६ आणि नियम १९८७ च्या तरतुदी नुसार अनर्हतेचे कारवाईस पात्र रहाल. वरील आदेशाचे काटेकोर पालन करावे, अन्यथा या पक्षादेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येईल, असे व्हीपमध्ये बजावण्यात आले आहे.