जळगाव - अवैध गावठी दारू भट्टीवर पोलिसांनी मारलेल्या छाप्यात तीन जणांना ताब्यात घेण्यात आले. तर, 80 हजार 250 रुपये किमतीचे दारू निर्मितीचे साहित्य आणि रसायन देखील नष्ट करण्यात आले. तर, 60 लीटर दारू जप्त करण्यात आली. देऊळवाडे येथे सोमवारी पहाटे चार वाजता कारवाई करण्यात आली.
पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी गेल्या आठवड्यात पदभार स्वीकारला. त्यांनी सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अवैध धंदेचालकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्या अनुषंगाने तालुका पोलिसांनी त्यांच्या हद्दीत सुरू असलेल्या गावठी दारू भट्ट्यांवर कारवाई सुरू केली. सोमवारी पहाटे चार वाजता पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे, अरुण सोनार, चेतन पाटील, विलास शिंदे, संजय चौधरी यांच्या पथकाने तालुक्यातील देऊळवाडे येथे धाव घेतली. नदीकाठी असलेल्या तीन दारुभट्ट्या पथकाने उद्ध्वस्त केल्या. याप्रकरणी राहुल चंद्रकांत सोनवणे, प्रकाश श्यामराव बाविस्कर व सुनील रामकृष्णा कोळी (सर्व रा. देउळवाडे) यांच्याविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.