जळगाव - माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा राकेश सपकाळे (वय २८, रा. शिवाजीनगर) याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली आहे. अटकेतील दोघांचे तीन साथीदार फरार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
गणेश दंगल सोनवणे (रा. वाल्मिकनगर, जळगाव) आणि विशाल संजय सपकाळे-साळुंखे (रा. प्रजापतनगर, जळगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. खूनाची घटना झाल्यानंतर मृत राकेशचा भाऊ सोनू सपकाळे याने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सोनू सपकाळे हा या घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे.
असा आहे हत्येचा घटनाक्रम -
तक्रारदार सोनू सपकाळे हा रात्री ११ वाजता कारचालक सलमान शेख युसूफ याच्यासोबत वडिलांना जेवणाचा डबा देण्यासाठी दुचाकीने शिवाजीनगर स्मशानभूमी परिसरातून जात होता. यावेळी विशाल व एक तरुण त्यांच्या मागून दुचाकीने येत होते. त्यांना पुढे जाण्यासाठी साईड दिली नाही, म्हणून त्यांनी वेगाने पुढे येत दुचाकी सोनूच्या दुचाकीसमोर आडवी लावली. यानंतर आणखी एका दुचाकीवर गणेश सोनवणे व दोन अनोळखी तरुण तेथे पोहोचले. त्या तरुणांनी लाथ मारुन सोनूची दुचाकी खाली पाडली. यानंतर गणेश याने हातातील तलवार सोनूच्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला. सोनूने डोक्यावरचा वार चुकवला. परंतु, त्याच्या हातावर तलवार लागली. यानंतर सर्वांनी सोनूला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. याचवेळी सोनूचा मोठा भाऊ राकेश व त्याचा मित्र सचिन लढ्ढा हे दोघे चारचाकीने घटनास्थळी पोहोचले. राकेशने सुरुवातीला हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. याचवेळी गणेशने राकेशच्या मांडीवर तलवारीने वार केले. तर विशालने चॉपरने डोक्यात वार केले. या हल्ल्यात राकेश गंभीर जखमी झाला होता. घटनास्थळी नागरिकांची देखील गर्दी वाढत असल्याचे पाहून मारेकरी दुचाकीवरुन पळून गेले. यानंतर सोनूने दुचाकीने घरी जाऊन मोठा भाऊ राजू याच्यासह कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. कुटुंबीयांनी घटनास्थळी येत जखमी राकेशला खासगी रुग्णालयात दाखल केले. तत्पूर्वी, त्याचा मृत्यू झाला होता.
आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी -
गुरुवारी पहाटे सोनू याने दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आरोपी गणेश सोनवणे व विशाल यांना अटक केली. दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. इतर आरोपी बेपत्ता झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
गँगवॉरमधून राकेशची हत्या ?
राकेशचा मोठा भाऊ राजू उर्फ बाबू याचा आज (गुरुवारी) वाढदिवस आहे. त्याची तयारी राकेशने केली होती. मात्र, काल झालेल्या वादात त्याची हत्या झाली. त्यामुळे वाढदिवस साजरा करण्याऐवजी मृत राकेशवर अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ सपकाळे कुटुंबीयांवर आली. वर्चस्व व गँगवॉरमधून राकेशची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे. त्या दृष्टीने पोलीस तपास सुरू आहे.