जळगाव - शहरातील गोलाणी मार्केटमध्ये तिसऱ्या मजल्यावरुन पडून मुकेश रमेश राजपूत या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री २ वाजेच्या सुमारास घडली होती. मुकेश याचा पडून नव्हे तिसऱ्या मजल्यावरून ढकलून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी बुधवारी तीन जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
अमर उर्फ लखन शांताराम बारोट, पराग उर्फ बबलू रवींद्र आरखे व निखिल राजेश सोनवणे अशी अटकेतील तिघांची नावे आहेत. शहरातील खाऊ गल्लीत मुकेश राजपूत हा चायनीजच्या गाडीवर कामाला होता. सोमवारी काम आटपवून नेहमीप्रमाणे तो घरी निघून गेला. अमर ऊर्फ लखन व पराग ऊर्फ बबलू या दोघांनी मुकेशला पार्टी करायची असे सांगत घरुन बोलावले. त्यानंतर दाणाबाजातून बिर्यानी व दारु घेतली. तिघेही दारु पिण्यासाठी गोलाणी मार्केटच्या तिसऱ्या मजल्यावर गेले. याठिकाणी दारु पित अमर व पराग या दोघांनी मुकेश सोबत वाद घातला. हमरीतुमरी झाल्यावर दोघांनी मुकेशला तिसऱ्या मजल्यावरून ढकलून दिले. यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मुकेशचा जागीच मृत्यू झाला होता.
हेही वाचा - Five Died In Road Accident : जळगावात पाच वाहनांचा भीषण अपघात.. पाच जण जागीच ठार
मुकेश खाली पडल्यानंतर अमर व पराग हे दोघेही स्वतः पोलीस ठाण्यात गेले. त्यांनी मुकेश हा तिसऱ्या मजल्यावरुन पडल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळ गाठून मुकेशचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. याप्रकरणी सीएमओ डॉ. अजय सोनवणे यांच्या माहितीवरून शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मंगळवारी दुपारी मुकेशच्या नातेवाईकांनी त्याचा अपघात नसून त्याच्यासोबत घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यानुसार पोलिसांनी गोलाणी मार्केट येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी करण्यात आली. एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मुकेशला दोन जण फेकताना कैद झाल्याचे समोर आले. पोलिसांनी अमर ऊर्फ लखन व पराग ऊर्फ बबलू या दोघांना ताब्यात घेतले आहे.