जळगाव - महापालिका मालकीच्या महात्मा फुले मार्केटमधील मुदत संपलेल्या गाळ्यांच्या भाड्याची थकबाकी न भरणारे आणखी १९ गाळे महापालिका प्रशासनाने गुरुवारी सील केले. या गाळेधारकांकडे १ कोटी ४४ लाख रुपये थकीत आहेत. आतापर्यंत फुले मार्केटमधील ५६ गाळे सील करुन २७ गाळे जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान, आजच्या कारवाईवेळी एक ते दोन ठिकाणी विरोध झाल्याने काहीवेळ गोंधळ निर्माण झाला होता.
महापालिका मालकीच्या मार्केटमधील मुदत संपलेल्या गाळेधारकांना ८१ ब ची नोटीस बजाविण्यात आली आहे. गाळेधारकांना थकीत भाडे भरण्यासाठी दिलेली मुदत संपली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून गाळे सील करण्याच्या कारवाईस टप्प्याटप्प्याने सुरुवात करण्यात आली आहे. गुरुवारी उपायुक्त उत्कर्ष गुट्टे यांच्या नेतृत्वाखाली दोन पथकांकडून सेंट्रल फुले मार्केटमधील १९ गाळे सील करण्यात आले. २८ कर्मचाऱ्यांची दोन पथके कारवाईसाठी सकाळी दहा वाजताच दाखल झाली. मात्र, कारवाईदरम्यान पोलीस बंदोबस्त नसल्याने पथक आल्यानंतरही पथकाकडून कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे अनेक गाळेधारकांनी कारवाई होण्याआधीच आपल्या दुकानातून साहित्य बाहेर काढायला सुरुवात केली. सकाळी ११.३० वाजता पोलिसांचा ताफा मार्केटमध्ये आल्यानंतर कारवाईला सुरुवात करण्यात आली. १९ पैकी ६ गाळे आधीच बंद होते. ६ गाळे मालासकट सील करण्यात आले. दरम्यान, महापालिकेकडून आतापर्यंत ४३ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. तर, ५६ गाळे देखील सील करण्यात आले आहे. आता उर्वरित गाळेधारकांना थकीत भाडे भरण्यासाठी २६ नोव्हेंबरची मुदत देण्यात आली आहे.
पोटभाडेकरू शोधणार -
या कारवाईदरम्यान महापालिका प्रशासनाने ज्यांना गाळे दिले होते; त्या मुळ गाळेधारकांनी आपले गाळे इतरांना विक्री केल्याचे आढळून आले. एका व्यापाऱ्याने तर तीन वर्षापुर्वीच एक गाळा १० लाखात खरेदी केला होता. संपुर्ण मार्केटमध्ये ५० ते ६० मुळ गाळेधारकांनी गाळे परस्पर विक्री केल्याचे याआधीही निदर्शनास आले आहे. आता अशा मुळ गाळेधारकांचाही शोध घेतला जाणार आहे.