जळगाव - शहरात काेराेनाचे रुग्ण दरराेज वाढत असून महापालिका प्रशासन गर्दी टाळण्याचे आवाहन करत आहे. परंतु, तरीही नागरिकांना आणि व्यावसायिकांना कोणत्याही प्रकारचे गांभीर्य नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने आता कारवाई अस्त्र उगारले आहे. गेल्या २ दिवसात ग्राहकांची गर्दी होत असलेली ३० दुकाने सील करण्यात आली आहेत. गुरुवारी देखील ही कारवाई सुरुच होती.
राज्य शासनाने ३ जूनपासून लाॅकडाऊन शिथील करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तीन टप्प्यात महापालिकेचे व खासगी व्यापारी संकुल वगळता अन्य दुकाने सम-विषम तारखांना सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ५ दिवसांपासून शहरातील दुकाने उघडली असली तरी नियमांची मात्र, पायमल्ली केली जात आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनासमाेरील कामाचा ताण दिवसेंदिवस वाढत असून अनलाॅकचा निर्णय अंगाशी येण्याची भीती वर्तवली जात आहे.
या दुकानांवर कारवाई-
बळीराम पेठ परिसरातील मनोहर साडीया, विशाल प्लास्टिक, ओम स्पोर्ट्स, किशोर एजन्सी, जैन कलेक्शन ऐश्वर्या साडिया, किशन शूज, गोलाणी मार्केटमधील महेश एजन्सी, कॉम्प्युटर शॉप, रॉयल काॅम्प्युटर, त्याचप्रमाणे स्टेडियम कॉम्प्लेक्समधील १७ अशी एकूण ३० दुकाने सील केली आहेत. मनपा उपायुक्त संताेष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाकडून ही कारवाई होत आहे.