जळगाव - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची महासभा १२ ऑगस्टला सकाळी ११ वाजता होईल. पालिकेच्या इतिहासात प्रथमच ऑनलाइन सभा हाेणार आहे. सभागृहात महापाैरांसह केवळ चार जणांना परवानगी असेल. नगरसेवक घरून तर प्रमुख पदाधिकारी १७ व्या मजल्यावरील दालनातून सभेच्या कामकाजात सहभागी हाेतील.
काेराेनामुळे निर्माण झालेल्या वातावरणाचा धाेरणात्मक निर्णय घेण्यासाठी आयाेजित केल्या जाणाऱ्या सभांवर देखील परिणाम झाला आहे. या अनुषंगाने काेराेना संसर्ग टाळण्यासाठी महापालिकेने प्रथमच ऑनलाइन सभेचा पर्याय स्वीकारला आहे. या निमित्ताने गेल्या पंधरा दिवसात प्रभाग समितीनिहाय डेमाे करण्यात आले. नगरसेवकांना घरी बसून सभेत सहभागी हाेण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच सभेच्या वृत्तांकनासाठी महापाैरांच्या दालनात पत्रकारांची बैठक व्यवस्था करून तेथे स्क्रीन लावले जातील.
अजेंडा आज अंतिम हाेणार
तब्बल पाच महिन्यानंतर १२ ऑगस्टला सकाळी ११ वाजता महापाैर भारती साेनवणे यांच्या अध्यक्षतेखाली सभा हाेईल. या सभेत पाच महिन्यातील अनेक विषय प्रलंबित असून सभागृहाची मान्यता घेण्यासाठी सभेसमाेर प्रस्ताव सादर केले जातील. सभेचा अजेंडा आज अंतिम हाेणार असून त्यानंतर नगरसेवकांकडे पाठवला जाणार आहे.
पालिकेचे प्रमुख पदाधिकारी सतराव्या मजल्यावर
महापालिकेच्या प्रथमच हाेणाऱ्या ऑनलाइन महासभेत सभागृहात महापाैर भारती साेनवणे, उपमहापाैर अश्विन साेनवणे, आयुक्त सतीश कुलकर्णी, नगरसचिव सुनील गाेराणे उपस्थित राहतील. तर भाजपचे गटनेते भगत बालाणी, शिवसेनेचे गटनेते अनंत जाेशी, एमआयएमचे रियाज बागवान, विराेधी पक्षनेता सुनील महाजन, स्थायी समिती सभापती शुचिता हाडा, ज्याेती चव्हाण, शिवसेनेचे नेते सुनील महाजन, कैलास साेनवणे, विशाल त्रिपाठी, जितेंद्र मराठे, दिलीप पाेकळे, सुनील खडके, रेशमा काळे, सचिन पाटील हे सतराव्या मजल्यावरून सभेत सहभागी हाेतील. सर्व नगरसेवक घरी बसल्या सभेत आपली भूमिका मांडू शकणार आहेत.