जळगाव - बहुप्रतीक्षित जळगाव ते मुंबई विमानसेवेला रविवारपासून पुन्हा सुरुवात झाली आहे. सकाळी १० वाजता जळगाव विमानतळावरून पहिले विमान मुंबईकडे झेपावले. या विमानामध्ये ५८ प्रवासी होते. यानंतर सकाळी १० वाजून ३८ मिनीटांच्या सुमारास अहमदाबादहून ६२ प्रवाशांना घेऊन एक विमान जळगावला पोहचले. यावेळी खासदार उन्मेष पाटील, आमदार चंदूलाल पटेल, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले यांनी उपस्थित राहून प्रवाशांचे स्वागत केले.
हैदराबाद येथील ट्रू जेट या कंपनीतर्फे अहमदाबाद ते जळगाव, जळगाव ते मुंबई व पुन्हा मुंबईहून कोल्हापूर अशी सेवा दिली जाणार आहे. जळगाव ते अहमदाबादचे तिकीट १ हजार ९९ रुपये आहे. तर मुंबईचे तिकीट १ हजार २९९ रुपये असेल. ट्रू जेट कंपनीच्या ७२ आसनी विमानाद्वारे ही सेवा देण्यात येणार आहे. मुंबईहून दुपारी ४ वाजून ३० मिनीटांनी विमान निघून सायंकाळी ५ वाजून ४० मिनीटांनी जळगावला पोहचेल. तसेच सायंकाळी ६ वाजून ५० मिनीटांनी जळगावहून अहमदाबादला विमान रवाना होणार आहे.
हे ही वाचा - जळगाव घरकुल घोटाळ्यावरील निकालाबाबत अण्णा हजारेंनी दिली 'ही' प्रतिक्रिया
रात्रीच्या विमानसेवेसाठी प्रयत्न करू - उन्मेष पाटील
जळगाव जिल्ह्याच्या चौफर विकासासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास विमानसेवे शिवाय अपूर्ण आहे. त्यामुळे आता नव्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून 'उडान' अभियानातंर्गत आजपासून जळगाव ते मुंबई आणि अहमदाबाद ते जळगाव अशी विमानसेवा सुरू झाली आहे. लवकरच जळगाव ते पुणे अशी विमान सेवा सुरू होईल. रात्रीची सेवा देखील सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील. अशी ग्वाही यावेळी जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांनी बोलताना दिली.
हे ही वाचा - जळगावात विदेशी पाहुण्यांनी लुटला बैल पोळ्याचा आनंद
आठ महिन्यांपासून सेवा होती बंद
दरम्यान, गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये जळगाव ते मुंबई अशी विमान सेवा सुरू झाली होती. मात्र, मुंबईत स्लॉट न मिळाल्याने ही सेवा अधूनमधून सूरू होती. गेल्या आठ महिन्यापासून ही सेवा पुर्णत: बंदच होती. डेक्कन विमान कंपनीने सेवा सुरू न केल्याने त्या कंपनीचा करार संपुष्टात आणून आता ट्रू जेट कंपनीला विमानसेवेच कंत्राट देण्यात आले आहे.