जळगाव - शहरातील ख्वाजामिया चौकातील मनपा मालकीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोज चौधरी यांनी अनधिकृतपणे हॉटेल उभारले होते. हे हॉटेल मनपाच्या अतिक्रमण निर्मुलन विभागाने काल तोडले. या उद्यानात सुमारे ८० फुटांवर पत्रे आणि प्लायवूडच्या सहाय्याने पक्के बांधकाम करून गेल्या तीन महिन्यांपासून हे हॉटेल सुरू होते.
हेही वाचा - लग्नसराईतही सोन्याची चमक फिक्की; आठवडाभरात किमतीत दीड हजारांची घसरण
मनपाच्या पथकाने उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई केली. यासह उद्यानात काही पक्के शेड देखील बांधण्यात आले होते. या ठिकाणी अश्लील चाळे सुरू असायचे, अशा अनेक तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. मनपाची ही महिनाभरातील तिसरी मोठी कारवाई ठरली आहे.
मनपा अतिक्रमण निर्मुलन विभागाकडून गेल्या काही दिवसांपासून शहरातील मोठ्या अतिक्रमणांवर कारवाई सुरू आहे. ख्वाजामिया चौकातील अनधिकृत प्रार्थनास्थळ, कालिंका माता चौक परिसरातील पक्के बांधकाम, दफनभूमी भागातील अनधिकृत झोपड्यांवर कारवाई केल्यानंतर मनपाच्या पथकाने ख्वाजामिया चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात अनधिकृतपणे बांधकाम केलेले हॉटेल जमिनदोस्त केले. अचानक केलेल्या कारवाईत हॉटेल मालकाला बचावासाठी कोणताही वेळ मनपा प्रशासनाने मिळू दिला नाही.
हॉटेलला कोणत्याही प्रकारची नव्हती परवानगी
महापौर भारती सोनवणे यांनी आठवडाभरापूर्वी पाहणी दौऱ्याच्या वेळेस हॉटेल मालकाला सात दिवसाच्या आत हे हॉटेल बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर मनपा प्रशासनाने आदेश काढत हे हॉटेल पाडण्याचा सूचना दिल्या होत्या. मनपा मालकीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात नोव्हेंबर २०२० मध्ये उभारण्यात आलेले हॉटेल हे बेकायदेशीर होते. या हॉटेलच्या उभारणीसाठी मनपाची कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती. त्यानुसार हे हॉटेल निष्कासित करण्याचे आदेश मनपाच्या शहर अभियंत्यांनी काढले होते.
कारवाई चुकीची, संस्था चालकांची भूमिका
महापौरांनी आदेश दिल्यानंतर ही जागा ज्या संस्थेला देण्यात आली आहे, त्या जेष्ठ नागरिक विचारमंच या संस्थेच्या अध्यक्षांनी मनपा आयुक्तांना वकिलामार्फत नोटीस बजावली होती. ही जागा मनपाने संस्थेला ३० वर्षांच्या कराराने दिली होती. या करारानुसार या ठिकाणी कॅन्टीन उभारण्याची परवानगी संस्थेला दिली होती. त्यानंतर मनपाने कराराचा भंग करून, ही जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर न्यायालयात याचिका दाखल करून ही कारवाई थांबविली होती. मनपाने केलेली कारवाई ही न्यायालयाच्या आदेशाचा भंग करणारी असल्याचा दावा संस्था चालकाने केला आहे.
मनपाची जागा, संस्थेने दिली भाड्यावर
मनपाने ही जागा संस्थेला दिली होती. मात्र, दुसऱ्या जागेवर बांधकामाची परवानगी असताना इतर जागेवर हे बांधकाम करण्यात आले. बांधकाम करताना मनपाची परवानगी घेतली गेली नाही. तसेच, ज्या संस्थेला ही जागा दिली होती, त्या संस्थेने शहरातील कालिंका माता चौक परिसरातील एका मोठ्या हॉटेल चालकाला हे हॉटेल भाडे तत्वावर दिल्याची माहिती मनपाच्या सूत्रांनी दिली आहे.
कारवाई थांबविण्यासाठीचा दबाव मनपाने झुगारला
मनपाने ही कारवाई अचानकपणे केली असून, याबाबत ठराविक कर्मचारी व अधिकाऱ्यांनाच माहिती देण्यात आली होती. मनपाचे पथक कारवाईसाठी पोहचल्यानंतर थेट कारवाईला सुरुवात झाली. यामुळे संस्थाचालक डिगंबर चौधरी यांचे पूत्र मनोज चौधरी यांनी कारवाई टाळण्यासाठी न्यायालयाच्या आदेशाची प्रत दाखवली. मात्र, मनपा उपायुक्तांनी चौधरी यांच्याकडे दुर्लक्ष करत कारवाई सुरूच ठेवली. त्यानंतर शहरातील काही प्रतिष्ठित राजकीय पदाधिकाऱ्यांनी ही कारवाई टाळण्यासाठी मनपाच्या अधिकाऱ्यांना फोन देखील केले. मात्र, राजकीय दबाव झुगारत मनपाने ही कारवाई सुरूच ठेवली. तब्बल तीन तासानंतर सर्व हॉटेल तोडण्यात आले.
उद्यानातील 'त्या' खोल्याही तोडल्या
उद्यानात मनपाची परवानगी न घेता तीन खोल्या देखील बांधण्यात आल्या होत्या. या ठिकाणी काही रहिवास देखील होती. मात्र, या ठिकाणी अश्लील चाळे सुरू असल्याच्याही तक्रारी या उद्यानात येणाऱ्या नागरिकांनी मनपा प्रशासनाकडे केल्या होत्या. यानुसार मनपाने या खोल्या देखील तोडल्या.
हेही वाचा - जळगाव जिल्हा रुग्णालयातील लिक्विड ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित होण्याची प्रतीक्षाच; ठेकेदाराला बजावली नोटीस