जळगाव - शहरातील विविध विकासकामांसाठी आलेल्या २५ आणि ५ कोटीच्या निधीतून मंजूर झालेली काही कामे अद्याप अपूर्ण आहे. जे ठेकेदार कामाला विलंब करत आहेत, त्यांच्यावर तात्काळ दंडात्मक कारवाई करावी, अशा सूचना महापौर भारती सोनवणे यांनी दिल्या. तसेच सर्व कामांचा सविस्तर अहवाल देखील महापौरांनी दोन दिवसात मागवला आहे. २५ कोटी आणि ५ कोटीतून मंजूर झालेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी महापौर सोनवणे यांनी मनपातील दालनात बैठक बोलावली होती. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, शहर अभियंता सुनील खडके व इतर अभियंता उपस्थित होते.
महापौरांनी सांगितले की, जळगाव शहराच्या विकासासाठी शासनाकडून २५ आणि ५ कोटींचा निधी प्राप्त झाला होता. मंजूर निधीतून शहरात कामाला सुरुवात झाली होती. काही ठेकेदारांनी अद्यापही काम पूर्ण केलेले नसून मार्च २०२१ मध्ये निधीची मुदत संपणार आहे. तत्पूर्वी सर्व कामे पूर्ण करणे आवश्यक आहे. दरम्यान, लॉकडाऊन असल्याने देखील कामे रखडली होती. लॉकडाऊन उघडला असून सर्वांनी कामाला त्वरित सुरुवात करावी. लॉकडाऊन काळाची मुदत वाढवून ठरलेल्या मुदतीत सर्व कामे ठेकेदारांनी पूर्ण करावी. जे ठेकेदार कामाला बिलंब करत असतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, अशा सूचना देखील महापौरांनी या वेळी दिल्या.
नोटीस देऊन अहवाल सादर करा
ज्या ठेकेदारांनी अद्याप काम पूर्ण केलेले नाही त्यांना तात्काळ नोटीस पाठवावी. सर्व कामांचा सविस्तर अहवाल दोन दिवसात सादर करावा, अशा सूचना देखील महापौर भारती सोनवणे यांनी दिल्या.