जळगाव - जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून करण्यात येणारी कामे ही जिल्ह्याच्या विकासात भर घालणारी ठरावीत. यासाठी प्रत्येक विभागामार्फत करण्यात येणारे काम दर्जेदार व गुणवत्तापूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
जिल्हा वार्षिक योजना खर्च आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीस जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जळगाव वन विभागाचे उप वनसंरक्षक विवेक होशिंग, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश चौधरी, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.
एक नजर निधीच्या आकडेवारीवर-
जिल्हा वार्षिक योजनेतून शासनाच्या निर्देशानुसार आतापर्यंत कोविडच्या उपाययोजनांसाठी 61.87 कोटी रुपयाची तरतुद करण्यात आली असून 48.44 कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तर 26.70 कोटी रुपयांचा निधी संबंधित यंत्रणांना वितरीत करण्यात आला आहे. त्याचबरोबर सन 20-21 मध्ये जिल्ह्याला सर्वसाधारण, अनुसुचित जाती, जमाती उपयोजनांसाठी 513 कोटी 43 लाख रुपयांचा नियतव्यव मंजूर असून अर्थसंकल्पीत तरतूद करण्यात आली आहे. त्याप्रमाणे जिल्ह्यास याप्रमाणे निधी बीडीएसवर प्राप्त झाला आहे. तर 50.26 कोटी रुपयांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडून वितरीत करण्यात आला असून 41.18 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांनी बैठकीत दिली.