जळगाव - 'मागच्या काळात भाजपाच्या खासदार रक्षा खडसेंनी पीक विम्याच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर आगपाखड करत राज्य सरकारला काही कळत नसल्याची टीका केली होती. आता पीक विमा प्रश्नी राज्य सरकारने सगळे केल्यानंतर रक्षा खडसे म्हणतात की हे आम्ही केले. हा प्रकार म्हणजे चीत भी मेरी, पट भी मेरी, असाच आहे. वाटायला लागलं इथं लग्न आहे, की हे लगेच वाजा घेऊन उभे राहतात', अशा शब्दात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी थेट खासदार रक्षा खडसेंवर टीका केली आहे. गुलाबराव पाटील शनिवारी (19 जून) सायंकाळी जळगावात होते. अजिंठा शासकीय विश्रामगृहात असताना ते पत्रकारांशी बोलत होते. तसेच, यावेळी त्यांनी आगामी निवडणुकांबाबत काँग्रेसकडून सुरू असलेल्या स्वबळाच्या चाचपणीबाबतही मत मांडले.
शिवसेना-भाजपमध्ये रंगला श्रेयवाद
केळी पीक विम्याचे निकष राज्य सरकारने पूर्वीप्रमाणे कायम ठेवले आहेत. कालच यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या मुद्द्यावरून आता शिवसेना व भाजपत श्रेयवाद रंगल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी याच मुद्द्यावरून भाजपा खासदार रक्षा खडसेंवर टीकास्त्र सोडले.
काय म्हणाले गुलाबराव पाटील?
'आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळात यांनीच राज्य सरकारवर आगपाखड केली होती. राज्य सरकारला काही कळत नसल्याची टीका केली होती. आता राज्य सरकारने याप्रश्नी प्रयत्न केले. एकीकडे भाजपचेच खासदार उन्मेष पाटील मान्य करत आहेत. तर दुसरीकडे खासदार रक्षा खडसे म्हणतात की हे आम्ही केले. हा प्रकार म्हणजे चीत भी मेरी, पट भी मेरी, असाच आहे. वाटायला लागलं इथं लग्न आहे, की हे लगेच वाजा घेऊन उभे राहतात', अशा शब्दांत गुलाबराव पाटील यांनी रक्षा खडसेंना लक्ष्य केले. दरम्यान, 'हे श्रेय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच मंत्रिमंडळाचे आहे', असेही ते यावेळी म्हणाले.
'ज्यांना गुदगुल्या होतात, त्यांनी वाट पाहावी'
यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांना पत्रकारांनी काँग्रेसकडून सुरू असलेल्या स्वबळाच्या चाचपणीबाबत विचारणा केली. यावरून पाटलांनी काँग्रेसला चिमटा काढला. 'काय नारा द्यावा, हा प्रत्येक पक्षाचा स्वतंत्र विषय आहे. आजतरी महाविकास आघाडीचे सरकार तीन जणांचे मिळून सुरू आहे. हे सरकार 5 वर्षे आपले राज्य चालवणार आहे. उद्या शिवसेनेने काय भूमिका जाहीर करावी, हे उद्धव ठाकरेंचे मत असणार आहे. शरद पवारांनी राष्ट्रवादीबाबत काय भूमिका मांडावी, हे त्यांचे मत असेल. तसे मत काँग्रेसने मांडले आहे. पण आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत. काळजी करू नये. ज्यांना गुदगुल्या होत आहेत, त्यांनी गुदगुल्यांची वाट पाहावी', असे गुलाबराव पाटील म्हणाले.
'शिवसेनेने जनतेचा विश्वास कायम ठेवलाय'
शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त बोलताना ते म्हणाले, 'आज पूर्वीच्या आठवणी ताज्या होत आहेत. आजवरच्या प्रवासात पूर्वीची शिवसेना आणि आजची शिवसेना, यातला फरक सर्वांना दिसतोय. तिसरी पिढी आज काम करत असताना शिवसेनेने 55 वर्षांचा जनतेचा विश्वास कायम ठेवला आहे. शिवसेना यापुढेही अशीच आगेकूच करत राहिल. '80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण' यानुसार शिवसेनेचे काम सुरू आहे. शिवसेनेचा वटवृक्ष जनतेला अशाच प्रकारे सावली देत राहो', असे त्यांनी म्हटले.
शिवसेनेचा आज ५५ वा वर्धापन दिन
दरम्यान, शिवसेनेचा आज (19 जून) ५५ वा वर्धापन दिन आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पक्षाचा हा आजचा दुसरा वर्धापन दिन आहे. कोरोनाचे संकट असल्याने उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन पद्धतीने शिवसैनिकांसोबत संवाद साधला.
हेही वाचा - आम्ही देखील स्वबळाचा नारा देऊ शकतो; उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला टोला