जळगाव - कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येनुसार संपूर्ण राज्यातील जिल्ह्यांची तीन झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला असून दुसऱ्या रुग्णाचा अहवाल सोमवारी निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे, संपूर्ण जिल्ह्याची स्थिती बघता जिल्हाभरातून एकही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह नसल्याने जळगाव जिल्ह्याचा समावेश ऑरेन्ज झोनमध्ये करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. या चर्चेत संपूर्ण राज्यांनी खबरदारी म्हणून लॉकडाऊन वाढीचा निर्णय घेतला आहे. तसेच कोरोनाच्या रुग्णसंख्येनुसार शहरांची तीन भागांमध्ये विभागणी करण्याचे निर्देश आहेत. यामध्ये 15 पेक्षा अधिक रुग्ण संख्या असलेले शहर रेड झोनमध्ये, पंधरापेक्षा कमी रुग्ण असलेले शहर ऑरेन्ज झोनमध्ये तर ज्या शहरात अद्याप एकही रुग्ण नाही त्या शहराला ग्रीन झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे.
व्यवहार सुरळीत होणार -
ग्रीन व ऑरेन्ज झोनमध्ये आतापर्यंत कोरोनाच्या रुग्णांची संख्या स्थिर आहे. या झोनमध्ये काही उपाययोजना करुन याठिकाणावरील संचारबंदीमध्ये शिथीलता येवू शकते. तसेच या दोन्ही झोनमधील शहरांमधील उद्योग व व्यापार सुरु होण्याबाबत राज्य शासनाकडून उपाययोजना केली जात आहे. जळगाव जिल्ह्याचा समावेश ऑरेंज झोनमध्ये असल्याने याठिकाणावरील व्यवहार सुरु होण्याची चिन्ह दिसून येत आहे.
जिल्हाबंदी कायम राहणार ?
संपूर्ण देशात संचारबंदी लागल्यापासून सर्व जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहे. ऑरेंज व ग्रीन झोनमधील जिल्ह्यांसह शहरांमधील संचारबंदीत शिथीलता देवून याठिकाणावरील व्यवहार सुरळीत करण्याबाबत राज्यशासन प्रयत्नशील आहे. मात्र संचारबंदी शिथील केली, तरी जिल्हाबंदी कायम ठेवण्यात येणार असून जिल्हातंर्गत वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
कोणत्या उद्योगांना मिळणार शिथीलता -
तीन झोनमध्ये विभागणी करण्याच्या सुचना केंद्र शासनाने राज्य शासनाला दिल्या आहेत. त्यानुसार राज्य शासनाकडून यावर उपाययोजना सुरु असून त्याबाबतचे नियोजन केले जात आहे. याबाबत अद्यापर्यंत कुठलाही निर्णय राज्यशासनाकडून जाहीर करण्यात आला नाही. येत्या काही दिवसांमध्ये याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यानंतरच जिल्ह्यातील उद्योग व कारखाने सुरु होणार असल्याने कारखानदारांनासह उद्योजकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.