जळगाव - जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने सुरूच आहे. शनिवारी रात्री उशिरा जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या कोरोना चाचणीच्या अहवालांमध्ये तब्बल 47 संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या संख्येने अहवाल पॉझिटिव्ह येण्याची ही पहिलीच वेळ आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 428 वर जाऊन पोहचली आहे.
जळगाव जिल्ह्यात कोरोना संशयित म्हणून स्वॅब घेतलेल्या व्यक्तींपैकी शनिवारी दिवसभरात 673 व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले. त्यापैकी 626 अहवाल निगेटिव्ह तर 47 अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 428 इतकी झाली आहे. दरम्यान, आतापर्यंत 179 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर 47 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.
भुसावळात पुन्हा 21 पॉझिटिव्ह रुग्ण-
रात्री उशिरापर्यंत प्राप्त झालेल्या अहवालांपैकी आधीच्या टप्प्यात जिल्ह्यातील भुसावळ, चाळीसगाव, चोपडा, वरणगाव, धरणगाव पारोळा येथील स्वॅब घेतलेल्या संशयित कोरोना व्यक्तींपैकी 114 व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले होते. त्यापैकी 88 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह 26 व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये भुसावळ येथील 21, वरणगावचे 3, चाळीसगाव व पारोळा येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे.