जळगाव - समाजाचे आपण काही देणं लागतो या उदात्त भावनेतून जळगाव शहर वाळू वाहतूक संघटना लॉकडाऊनच्या काळात गोरगरिबांच्या मदतीसाठी पुढे सरसावली आहे. हातावर पोट असणाऱ्या गरजू मजुरांची जेवणाची अडचण लक्षात घेऊन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्व-खर्चाने जेवण पुरवणे सुरू केले आहे. या माध्यमातून दररोज सकाळी तसेच रात्री सुमारे अडीच ते तीन हजार लोकांची भूक भागत आहे.
कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या लोकांच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. लॉकडाऊनमुळे उद्योग-व्यवसाय ठप्प असल्याने रोजंदारी करणाऱ्यांना कामधंदा मिळत नाही. अशा परिस्थितीत स्थानिकांसह परप्रांतीय मजुरांच्या उदरनिर्वाहाची समस्या निर्माण झाली आहे. सुरुवातीचे 4 ते 5 दिवस कशीबशी गुजरन केल्यानंतर जळगावातील शेकडो मजुरांसमोर पोटाची आग कशी विझवायची? हा मोठा प्रश्न होता. हीच परिस्थिती लक्षात घेऊन जळगाव शहर वाळू वाहतूक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गोरगरिबांना आर्थिक मदत देऊ केली. मात्र, आर्थिक मदत करूनही मजुरांच्या भुकेचा प्रश्न सुटणार नव्हता. म्हणून सर्वांनी आपणच जेवण तयार करून ते थेट गरिबांना घरपोच देण्याचे ठरवले.
![Jalgaon](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-jlg-03-food-distribution-for-needful-people-7205050_08042020172644_0804f_1586347004_118.jpg)
गेल्या 8 दिवसांपासून वाळू वाहतूक संघटना ट्रान्सपोर्ट नगरात जेवण तयार केल्यानंतर ते पाकिटबंद करून गरजूंना घरपोच देत आहेत. सकाळी आणि रात्री हा उपक्रम नियमितपणे सुरू आहे. सकाळी हजार ते दीड हजार जेवणाची पाकिटे आणि रात्री पुन्हा हजार ते दीड हजार जेवणाची पाकिटे मिळून सुमारे अडीच ते तीन हजार लोकांची भूक भागत आहे. विशेष म्हणजे, सात्विक आहार दिला जात आहे. या कामात संजय ढेकळे, रवी सपकाळे, दगडू सपकाळे, विठ्ठल पाटील यांच्यासह अनेकांचे सहकार्य लाभत आहे. औद्योगिक वसाहत, मेहरूण परिसरातील गरजूंना जेवणच नाही तर पिण्यासाठी पाणी देखील टँकरद्वारे उपलब्ध करून दिले जात आहे.
जिल्हा प्रशासनालाही मदतीचा हात -
शहरातील औद्योगिक वसाहत परिसर, मेहरूण, रामेश्वर कॉलनी, खेडी, रायपूर, कुसुंबा, जुने जळगाव अशा विविध परिसरात जेवणाची पाकिटे वाटली जात आहेत. विशेष म्हणजे, जेवणाची पाकिटे दोन्ही वेळेला घरपोच दिली जात आहेत. याशिवाय शहरातून जाणारे परप्रांतीय मजूर, गोरगरीब नागरिकांना देखील थांबवून सोशल डिस्टन्सिंग पाळत जेवण दिले जात आहे. जिल्हा प्रशासनाने परप्रांतीय मजुरांसाठी शहरात ठिकठिकाणी उभारलेल्या निवारागृहात देखील जेवणाची पाकिटे पुरवली जात आहेत.