जळगाव -ग्रामपंचायतीची निवडणूक म्हटली की गावकी-भावकीचे राजकारण आलेच. मग यात वैयक्तिक हेवेदावे आणि कुरघोड्या तरी मागे कशा राहणार. परंतु, जळगाव जिल्ह्यातील म्हसावद हे गाव असे आहे, ज्या ठिकाणी विकासाच्या बळावर चिंचोरे घराणे ग्रामपंचायतीत आपले पॅनल निवडून आणत असते. ग्रामपंचायत निवडणुकीत पॅनल निवडून आणण्याची अर्धशतकी परंपरा या चिंचोरे घराण्याला लाभली आहे. या वेळेस देखील चिंचोरे घराण्याच्या 'नम्रता' पॅनलला मतदारांनी कौल दिला आहे.
जळगाव तालुक्यातील म्हसावद हे गाव सुमारे 20 ते 25 हजार लोकसंख्येचे गाव आहे. या गावात ग्रामपंचायतीची स्थापना झाली, तेव्हापासून चिंचोरे घराण्यातील व्यक्ती ग्रामपंचायतीत प्रतिनिधित्व करत आहे. विशेष म्हणजे, चिंचोरे घराण्यातील पॅनलच सातत्याने याठिकाणी निवडून येत असते. ग्रामपंचायत सदस्य ते सरपंच अशी पदे चिंचोरे घराण्यातील अनेक व्यक्तींनी पूर्वीपासून भूषवली आहेत. गावाच्या विकासाच्या दृष्टीने सर्व समाजातील लोकांना प्रतिनिधित्वाची संधी देऊन चिंचोरे घराण्याने ही परंपरा आजतागायत जोपासली आहे.
याही वेळेस निवडून आलेय पॅनल -
म्हसावद ग्रामपंचायतीत 17 सदस्य निवडून येत असतात. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत देखील चिंचोरे परिवाराच्या नम्रता पॅनलच्या सर्वाधिक 9 जागा निवडून आल्या आहेत. गावाच्या विकासाच्या दृष्टीने प्रगती पॅनलने नम्रता पॅनलला बिनशर्त पाठींबा दिला आहे. त्यामुळे सरपंचपदाच्या निवडीत चिंचोरे गटालाच कौल मिळणार आहे.