जळगाव - घरकुल घोटाळ्याचा निकाल लागला तरी या योजनेतील गोरगरीब अजुनही घरकुलांच्या प्रतिक्षेत आहेत. सध्या जळगाव नगरपालिकेतील घरकुल घोटाळा राज्यभर चर्चेचा विषय ठरला आहे. या घोटाळ्यात माजी मंत्री सुरेश जैन, गुलाबराव देवकर यांच्या सारख्या बड्या नेत्यांना शिक्षा झाल्यानंतर आता वर्षानुवर्षे धूळखात पडलेल्या घरकुलांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सरकारने घरकुलांचे नूतनीकरण करून ती गोरगरिबांना दिली पाहिजेत, अशी मागणी होऊ लागली आहे.
घरकुल योजना ही तत्कालीन जळगाव नगरपालिकेची योजना होती. झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना स्वस्त दरात चांगली घरे देण्यासाठी तत्कालीन नगरपालिकेतील सत्ताधारी गटाने झोपडपट्टी निर्मूलनाच्या उद्देशाने ही योजना राबवण्याचे ठरवले होते. त्यासाठी शहरातील हरी विठ्ठलनगर, पिंप्राळा, शिवाजीनगर, खंडेरावनगर, समतानगर आणि तांबापुरा या ठिकाणी ११० कोटींचे कर्ज काढून ११ हजार घरकुले बांधण्याच्या कामास १९९९ मध्ये सुरुवात झाली. मात्र, २००१ मध्ये या योजनेतला घोळ समोर आला. पुढे हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्याने अपूर्ण घरकुलांचे काम पूर्ण होऊ शकले नाही. आजही सर्व ठिकाणी घरकुलांचे केवळ सांगाडे उभे आहेत. वर्षानुवर्षे धूळखात पडल्याने त्यांची दुरवस्था झाली आहे.
हे ही वाचा - जळगाव घरकुल घोटाळ्यावरील निकालाबाबत अण्णा हजारेंनी दिली 'ही' प्रतिक्रिया
पिंप्राळा व शिवाजीनगर भागात काही घरकुलांमध्ये रहिवासी आहेत. हरी विठ्ठलनगरात तर घरकुल उभारलेही नाहीत. तांबापुरा व मेहरुण भागातील घरकुलांचे बांधकाम अपूर्ण आहे. त्यांचा सांगाडा आता जीर्ण झाला आहे. यामध्ये अनेक प्रकारची बेकायदेशीर धंदे सुरू आहेत. काही ठिकाणच्या घरकुलांमध्ये सट्टा, मटका, हातभट्टीची दारू विक्री, अनैतिक कृत्ये असे गंभीर प्रकार सुरू आहेत. यापेक्षा धक्कादायक बाब म्हणजे, काही लोकांनी घरकुले बळकावून त्यांचा अनधिकृत वापरही सुरू केला आहे. अनेक घरकुलांमध्ये जनावरांचे गोठे उभारले आहेत. ज्या गोर गरिबांना डोळ्यासमोर ठेवून ही योजना आखली, त्याचा हेतू साध्य करण्यासाठी शासनाने ही घरकुले विकसित केली पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
हे ही वाचा - पडघम विधानसभेचे : जळगाव शहराच्या जागेवरून भाजप-सेनेत विस्तव धगधगता !
तत्कालीन जळगाव नगरपालिकेने उभारलेली घरकुले बेकायदेशीर असून त्यांचा पुनर्विकास करणे अशक्य आहे, असे कायदेतज्ज्ञ म्हणतात. परंतु, याप्रश्नी सरकारने लवकरात लवकर तोडगा काढायला हवा, अशी सर्वसामान्य जळगावकरांची अपेक्षा आहे. घरकुलांसंदर्भात तोडगा काढण्यात सरकारला यश आले तर जळगाव शहर खऱ्या अर्थाने झोपडपट्टीमुक्त होऊ शकते.
हे ही वाचा - सुरेश जैन विधानसभा लढवणार; भाजपमधील इच्छुकांच्या अडचणीत होणार वाढ