जळगाव - जात वैधता प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या तिघांना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. बुधवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात जात पडताळणी समिती कार्यालयातील वरिष्ठ लिपिकासह अन्य दोघांचा समावेश आहे.
या कारवाईमुळे पैशांच्या आधारे जात वैधता प्रमाणपत्र मिळवून देणारे रॅकेट जात पडताळणी समिती कार्यालयात सक्रिय असण्याची शक्यता आहे. घन:श्याम रामगोपाल टेमानी (रा. भुसावळ), ललित खुशाल किरंगे (रा. भुसावळ) आणि ललित वाल्मिक ठाकरे (रा. पिंप्राळा, जळगाव) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.
घनश्याम टेमानी हा भुसावळ शहरातील संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहे. तर ललित किरंगे हा जळगाव शहरातील जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात नोकरीला आहे. या दोघांचे जात पडताळणी समिती कार्यालयातील वरिष्ठ लिपिक ललित ठाकरे याच्याशी साटेलोटे होते. हे तिघेही संगनमताने लोकांकडून पैसे घेऊन जात वैधता प्रमाणपत्र देत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
काय आहे प्रकरण?
या प्रकरणातील तक्रारदाराच्या मुलीला भुसावळ शहरातील संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयात प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्राची गरज होती. म्हणून याच महाविद्यालयात वरिष्ठ लिपिक म्हणून काम करणाऱ्या घन:श्याम टेमानी याने 'मी सर्व व्यवस्था करतो, मला ४० हजार रुपये द्या', अशी मागणी तक्रारदारकडे केली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार पथकाने भुसावळात हिंदी महाविद्यालयात बुधवारी दुपारी सापळा लावला होता.
सायंकाळी ६ वाजता टेमानी याने रेल्वेच्या गार्ड लाईन परिसरात तक्रारदारकडून ४० हजार रुपये स्वीकारले. याच वेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याची चौकशी केली असता ललित किरंगे हा ललित ठाकरेकडून जात वैधता प्रमाणपत्र आणून देणार असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लागलीच सूत्रे हलवून किरंगे याला जळगाव शहरातील अजिंठा चौफुलीवर ताब्यात घेतले. त्यानंतर ललित ठाकरेला देखील अटक झाली. प्राथमिक चौकशीत या प्रकरणात टेमानी, किरंगे आणि ठाकरे यांचा सहभाग निष्पन्न झाल्याने तिघांना रात्री उशिरा अटक करण्यात आली.