जळगाव - जात पंचायत विरोधी कायदा अस्तित्त्वात असताना जात पंचायतींच्या मनमानीचे प्रकार काही कमी होताना दिसत नाही. याबाबत नुकताच एक अमानुष प्रकार समोर आला आहे. चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील एका महिलेला तिने दुसरे लग्न केले म्हणून जात पंचायतीच्या पंचांनी अमानुष शिक्षा केली. केळीच्या पानावर पंचांची थुंकी चाटण्यासह 1 लाख रुपये दंड या महिलेला आकारण्यात आला. पीडित कुटुंबाला जातीतून बहिष्कृत देखील केले गेले. या प्रकारासंदर्भात गुन्हा दाखल व्हावा म्हणून अंनिसचे पदाधिकारी प्रयत्न करत आहेत. पीडित महिलेची प्रकृती बिघडली असून, ती उपचार घेत आहे. त्यामुळे ती पोलिसात तक्रार देण्यासाठी गेली नसल्याचे सांगण्यात आले.
काय आहे प्रकरण?
चहार्डी येथील पीडित महिलेचा 2011 साली पहिला विवाह झाला होता. मात्र, पती दारू पिऊन सतत मारहाण करत असल्याने 2015 मध्ये तिने न्यायालयात रितसर घटस्फोट घेतला. पीडित महिलेने न्यायालयात जाणे तिच्या समाजाच्या जात पंचायतीच्या पंचांना मान्य नव्हते. त्यांनी हा घटस्फोट धुडकावून लावला. दरम्यान, पीडित महिलेने 2019 मध्ये एका घटस्फोटीत व्यक्तीशी पुनर्विवाह केला. पुनर्विवाह जात पंचायतीच्या पंचांनी अमान्य करत पीडितेला 1 लाख रुपयांचा दंड केला. पंचांनी एकत्र येऊन न्यायनिवाडा करण्याच्या नावाखाली पीडितेच्या कुटुंबाला जातीतून बहिष्कृत केले. त्यांना धार्मिक, सामाजिक कार्यात सहभागी होण्यास बंदी घालण्यात आली. त्यांना मदत करणाऱ्या इतर चार परिवारासही बहिष्कृत करण्यात आले, अशी माहिती अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष दिगंबर कट्यारे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
अत्यंत अमानुष शिक्षा -
पीडित महिलेने पहिल्या नवऱ्या सोबत रहावे, असा हेका पंचांनी कायम ठेवला. तसेच पुन्हा जातीत येण्यासाठी एक अमानुष शिक्षा दिली. ती म्हणजे पंचांनी केळीच्या पानावर थुंकायचे व त्या महिलेने ते चाटायचे. विशेष म्हणजे, कोरोना काळात ही शिक्षा दिली गेली गेली आहे. पंचांच्या पायातील जोडे पीडित महिलेने डोक्यावर घेऊन पंचाच्या पायावर नाक घासायचे नंतर पीडित महिलेचे तोंड काळे करण्याची शिक्षा देण्यात येईल, असे पंचांनी जाहीर केले. पीडित महिला पंचाच्या दबावामुळे सध्या माहेरी राहत आहे. तिच्या दुसऱ्या नवऱ्यालाही जात पंचायतीने धमकी दिली आहे. न्यायालयाचा निकाल मानायचा असेल तर पीडित कुटुंबाने धर्म बदलावा, असा हुकूम पंचांनी काढला आहे. दरम्यान, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्यांच्या मदतीला धावून आली आहे. समितीचे कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे, दिगंबर कट्यारे, डाॅ.अय्युब आर. पिंजारी व जिल्हा महिला असोसिएशनच्या वासंती दिघे गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
हेही वाचा - आजपासून महापालिकेच्या ५ केंद्रांवर १८ वर्षांवरील लाभार्थ्यांचे लसीकरण; नोंदणी केलेल्यांनाच प्राधान्य