जळगाव - दिवाळीसाठी गावी आलेल्या अनेक रेल्वे प्रवाशांचे परतीचे तिकीट वेटिंगवर होते. हे वेटिंग तिकीट कन्फर्म न झाल्याने अनेक प्रवाशांना तिकीट रद्द करावे लागले. सोमवार, मंगळवार व बुधवार (दि. १६ ते १८) या तीन दिवसात भुसावळ, चाळीसगाव, जळगाव आणि पाचोरा येथील तब्बल ८९६ प्रवाशांनी वेटींग तिकीटे रद्द केली आहेत. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने या प्रवाशांना सुमारे २ लाख ७५ हजार ७९० रुपयांचा परतावा दिला आहे. परिणामी या प्रवाशांना इच्छित स्थळी जाण्यासाठी आता खासगी ट्रॅव्हल्स अथवा एसटी बसचा आधार घ्यावा लागणार आहे. त्यामुळे रल्वेची संख्या वाढविण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
काेराेनामुळे मोजक्या रेल्वेगाड्यांची सेवा सुरु असून, आरक्षण तिकीट कनफर्म असलेल्या प्रवाशांनाच रेल्वेत प्रवेश दिला जात आहे. ज्या प्रवाशांचे तिकीट कनफर्म नाही त्यांना रेल्वे स्थानकावर प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे वेटिंग तिकीट असणारे प्रवाशी तिकीट रद्द करत आहेत. अनेक प्रवासी ऑनलाइन पद्धतीने तिकीट काढतात. त्यांचे तिकीट कनफर्म न झाल्यास त्यांचे तिकीट आपोआप रद्द हाेते. तर आरक्षण खिडकीवरून तिकीट काढल्यानंतर ते कनफर्म न झाल्यास, प्रवाशांना ते रद्द करावे लागते.
तत्काळ खिडकीकडे प्रवासी, तरीही निराशाच-
दिवाळीसाठी आलेल्या बहुतांश प्रवाशांचा आता परतीचा प्रवास सुरू झाला आहे. त्यासाठी अनेक प्रवाशांनी रेल्वेच्या प्रवासाला प्राधान्य दिले आहे. अनेक प्रवाशांनी प्रवासाच्या दिवसापर्यंत तिकीट कनफर्म हाेईल, या आशेवर वेटींग तिकीटे काढली होती. मात्र, ऐनवेळी तिकीट कनफर्म न झाल्याने ते आता रद्द करावे लागत आहे. त्यामुळे अनेक प्रवासी आता तत्काळ तिकीटांकडे वळले आहेत. एकाच मार्गावरील दोन ते तीन गाड्यांचे अर्ज घेऊन प्रवासी रांगेत उभे राहतात. दरराेज सकाळी ९ वाजेपासून भुसावळातील तात्काळ तिकीट खिडकीवर प्रवाशांची माेठी रांग लागलेली असते. तात्काळ तिकीटही वेटींग मिळत असल्याने नाराजी व्यक्त होते. रेल्वे प्रशासनाने गाड्यांची संख्या वाढवणे अपेक्षित आहे.
तिकिटे रद्द झाल्यानंतर एसटीबसचा पर्याय-
२० प्रवाशांसाठी जादा बस ट्रॅव्हल्सचे वेळेवर आरक्षण मिळत नसल्याने बहुसंख्य प्रवासी एसटीला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे भुसावळ आगाराने सूरत, शिर्डी, नाशिक, बुलडाणा, औरंगाबाद, पुणे, कल्याण या मार्गावर या बसेस सुरू करून प्रवाशांची गैरसाेय दूर केली आहे. तसेच लांब पल्ल्याचे एकाचवेळी २० पेक्षा जास्त प्रवासी आल्यास त्या मार्गावर तत्काळ जादा बस सोडली जात आहे.
३ दिवसात रद्द झालेली तिकिटे
स्टेशन - तिकीट संख्या - परतावा
भुसावळ- ३९९ - १ लाख ३ हजार
चाळीसगाव- ७१ - ३४ हजार ४८०
पाचाेरा -२८- ४ हजार ६३०
जळगाव - ३९८ - १ लाख ३३ हजार