जळगाव- अनलॉकनंतर जिल्हा व आंतरजिल्हा बसफेऱ्या सुरू झाल्या आहेत. याला प्रवाशांचा प्रतिसाद पाहता एसटी महामंडळाने आता आंतरराज्य बसफेऱ्यांना परवानगी दिली आहे. जिल्ह्यातील ११ आगारातून दिवसभरात मध्य प्रदेश, गुजरात राज्यातील विविध शहरांमध्ये ५४ फेऱ्या होणार आहेत. उद्यापासून (१४ सप्टेंबर ) या बसफेऱ्यांना सुरुवात होणार आहे. फेऱ्यांचे वेळापत्रक विभागाने तयार केले आहे, अशी माहिती विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा यांनी दिली.
लॉकडाऊननंतर गेल्या २० दिवसांपासून बसफेऱ्यांना सुरुवात झाली आहे. कोरोना संसर्गजन्य स्थिती अद्यापही कायम असल्याने सुरुवातीस प्रवाशांनी एसटी प्रवासाकडे पाठ फिरवली होती. हळूहळू प्रवाशांची संख्या वाढत असल्याने आता महामंडळाने आंतरराज्य प्रवास करण्यास परवानगी दिली आहे. यानुसार आता प्रवाशांना अंकलेश्वर, वापी, सेल्वास, पावागड, उधना, बडोदा शहरांसह नवसारी, बऱ्हाणपूर, इंदूर या शहरात जाण्यासाठी एसटीने प्रवास करता येणार आहे. प्रवासभाडे हे पूर्वी प्रमाणेच असणार आहे, असे आगार प्रशासनाने सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात बससेवा बंद होती. आता अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्याने व प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन बससेवेस प्रारंभ करण्यात येत आहे. कोलमडलेली सेवा पूर्वपदावर येवू लागली असून आंतरराज्य बसफेऱ्यांमुळे जळगाव विभागाचे ५० टक्के शेड्युल पूर्वपदावर येणार आहे.
काही बसफेऱ्या व त्यांची वेळ अशी
जळगाव ते वापी (सकाळी ८ वाजता), वापी ते जळगाव (सकाळी ७.४५ वाजता), जळगाव ते अंकलेश्वर (सकाळी ८.३० वाजता), अंकलेश्वर ते जळगाव (सकाळी ७.३० वाजता), जळगाव ते नाशिक (सकाळी १० वाजता), नाशिक ते जळगाव (सकाळी ७ वाजता), जळगाव ते मुंबई (सकाळी ७.३० वाजता), मुंबई ते जळगाव (सकाळी ७.३० वाजता).
हेही वाचा- 'त्या' कैद्याच्या मृतदेहाचे इनकॅमेरा शवविच्छेदन; व्हिसेरा राखीव, प्रकरणाची न्यायालयीन चौकशी