जळगाव - नवसाच्या कार्यक्रमानिमित्त बाहेरगावी गेलेल्या वकिलाच्या घरी चोरी झाली आहे. अज्ञात चोरट्याने घराचा कडीकोंडा तोडून दीड लाख रुपयांसह मुद्देमाल चोरला आहे. ही घटना पारोळा शहरातील न्यू बालाजी नगरमध्ये घडली.
हेही वाचा - जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी राजकीय माेर्चेबांधणी सुरू
दीड लाखांचा मुद्देमाल लंपास
पारोळा शहरातील सतीश नानाभाऊ पाटील (रा. न्यू बालाजी नगर) हे काल आपल्या पुतण्याच्या नवसाच्या कार्यक्रमानिमित्त त्यांच्या मूळ गावी नेरी (ता. पाचोरा) येथे गेले होते. याचे औचित्य साधत काल मध्यरात्री अज्ञात चोरट्याने घराच्या पुढच्या दरवाजाची कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला व कपाटात असलेल्या बॅग व पर्स मधील ८० हजार रुपये रोख, ९ ग्रॅम सोने, डोंगल, सात भार चांदीचा गोप व शिक्के, असे एकूण एक दीड लाखांचा मुद्देमाल घेऊन पसार झाला.
अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
चोरट्याने घरातील सामान अस्ताव्यस्त फेकले होते. पहाटेच्या सुमारास शेजाऱ्यांना ही घटना लक्षात आली. त्यानंतर सतीश पाटील यांना फोन करून कळवण्यात आले. ते घरी आल्यानंतर पारोळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. घटनास्थळी पोलिसांनी पाहणी करून पंचनामा केला आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - धक्कादायक; जळगावात खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांवर छुप्या पद्धतीने उपचार