जळगाव - कोरोनासाठी अधिग्रहित केलेल्या जळगावातील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या गलथान कारभाराची एकेक प्रकरणे दररोज समोर येत आहेत. कोरोनाची लागण झालेल्या एका 82 वर्षीय वृद्धाला या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्या वृद्धाचा 5 दिवसांपूर्वी मृत्यू झाला. त्यांच्यावर अंत्यसंस्कार देखील झाले. परंतु, असे असताना वृद्धावर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचे दाखवून तशी माहिती वृद्धाच्या नातेवाईकांना देण्यात येत होती. धक्कादायक बाब म्हणजे, या काळात वृद्धाचा दैनंदिन वैद्यकीय तपासणी अहवाल तयार केला जात होता. वृद्धाच्या नातेवाईकांनी हा गैरप्रकार समोर आणला आहे.
मृत वृद्ध जळगाव तालुक्यातील आसोदा येथील रहिवासी होते. महिनाभरापूर्वी प्रकृती खराब झाल्यामुळे त्यांची शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात कोरोनाची चाचणी करण्यात आली. कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना लागलीच डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर काही दिवसांनी त्यांची प्रकृती अधिक खालावल्यामुळे 10 दिवसांपूर्वी त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना 4 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजता त्यांचा मृत्यू झाला. रुग्णालयाने ही माहिती कुटुंबीयांना दिली. यानंतर मृत वृद्धाचा मुलगा व जावई या दोघांनी 5 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता मृतदेह ताब्यात घेऊन भुसावळ येथे अंत्यसंस्कार केला.
यानंतरही या वृद्धाच्या दैनंदिन तपासणीचा अहवाल तयार केला जात असल्याची खळबळजनक माहिती मृताचे नातू, जावई यांना मिळाली. त्यांनी याबाबत 8 सप्टेंबर रोजी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये पहिला फोन केला. मृताचे नाव सांगत त्यांची प्रकृती कशी आहे, याची विचारणा केली. यावेळी रुग्णालयाच्या प्रतिनिधीने ‘तुम्हाला फोटो पाठवला आहे. तब्येत क्रिटीकल आहे, 90 टक्के ओटूचे प्रमाण आहे आणि पल्सरेट 108 आहे. ओटूचे प्रमाण 95 किंवा 96 लागते, पल्सरेट 72 ते 90 दरम्यान लागतो. आता ते व्हेंटिलेटरवर आहेत, त्यांना आयसीयूमध्ये दाखल केले आहे. आता पुढे काय होते ते सांगता येत नाही, प्रयत्न सुरू आहेत.’ असे उत्तर मिळाले. यानंतर मृताचे जावई यांनी 9 सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा फोन केला. यावेळी देखील त्यांना अशाच प्रकारची उत्तरे मिळाली. रुग्ण मृत झाल्यानंतर देखील त्यांच्या वैद्यकीय तपासणीचे अहवाल रुग्णालयात तयार होत असल्याचे हे गंभीर प्रकरण या निमित्ताने समोर आले आहे.
अहवालाची प्रत मिळवली, कॉल रेकॉर्डिंग उपलब्ध -
दरम्यान, 9 सप्टेंबर रोजी सकाळी 8 ते दुपारी 2 च्या दरम्यान प्रत्येक तासाला या वृद्धावर काय उपचार केले गेले. पल्सरेट व इतर बाबी तपासल्याचा अहवाल तयार केला गेला आहे. या अहवालावर डॉक्टर, इंटर्नच्या समोर 'प्रणव' असे नाव लिहिलेले आहे. रुग्णाचे नाव व तारीख लिहिलेली आहे. या अहवालाची प्रत मृताचे नातू, जावई यांनी बुधवारी मिळवली. तसेच रुग्णालयात सलग दोन दिवस केलेल्या फोनचे रेकॉर्डिंगदेखील त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. या प्रकरणी रुग्णालय प्रशासनावर कडक कारवाई करावी, अशी मागणी मृताच्या नातेवाईकांनी केली आहे.
हेही वाचा - जळगावच्या सुपुत्राचा सातासमुद्रापार झेंडा; ऑस्ट्रेलियाच्या निवडणूक आयोगात प्रकल्प व्यवस्थापक प्रमुखपदी निवड