जळगाव - भडगाव येथील मास्टर लाईन या टायर गोडाऊनचे चॅनल गेट व आतील दरवाजा उघडून अज्ञात चोरट्यांनी अंदाजे अडीच लाख रुपये किमतीचे दुचाकीचे १९४ टायर लांबविले. याबाबत भडगाव पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते.
चोरीसाठी चारचाकी वाहनाचा वापर
भडगाव - पाचोरा रस्त्यालगत एमआयडीसी भागात असलेले मास्टर लाईन हे टायर गोडाऊन २५ जानेवारीला सायंकाळी बंद केले. दरम्यान, दुसऱ्या दिवशी सुटी असल्याने गोडाऊनला कोणी आलेच नाही. २७ रोजी गोडाऊनला कार्यरत असलेले कर्मचारी व अधिकारी हे ड्युटीवर आल्यानंतर गोडाऊन फोडल्याचे लक्षात येताच ही घटना मालक समीर जैन यांना कळविण्यात आली. त्यानंतर पोलीस निरीक्षक अशोक उतेकर, फौजदार पठारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता गोडाऊनमधून अज्ञात चोरट्यांनी मोटारसायकलचे १९४ टायर चोरून नेल्याचे दिसून आले.
हेही वाचा - जळगाव महापालिकेच्या ४२ कोटींच्या कामांना पुन्हा स्थगिती
ही घटना २५ अथवा २६ च्या रात्री घडली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चोरट्यांनी गोडाऊनच्या चॅनल गेटचे कुलूप व आतील दरवाजाचे कुलूप तोडत आत प्रवेश केला. चोरीसाठी चारचाकी वाहन वापरण्यात आले असून याचे वाहन वीज वितरण कंपनीच्या बाजूला असलेल्या झुडपाजवळ अंदाजे दोनशे ते अडीचशे मीटर अंतरावर पार्क केले होते.
श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना केले पाचारण
एवढ्या अंतरापर्यंत या चोरट्यांनी तब्बल १९४ टायर वाहून नेले. अंदाजे अडीच लाखाचे टायर या चोरट्यांनी लांबविले. गोडाऊन ते चोरीसाठी वापरलेले वाहन या दरम्यानचे अंतर अंदाजे अडीचशे मीटर असल्याने चोरट्यांची संख्यादेखील जास्त असल्याची शक्यता आहे. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे. घटनास्थळी श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले होते. श्वान परिसरात घुटमळत राहिला. या प्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - जळगाव: तीन हजारांची लाच घेताना वरिष्ठ सहाय्यकाला अटक; एसीबीची कारवाई