जळगाव- कौटुंबिक वादातून पतीने कुऱ्हाडीने गळ्यावर वार करत पत्नीची हत्या केली. ही घटना आज पहाटे अडीच वाजताच्या सुमारास जळगाव शहरातील खेडी उपनगरातील आंबेडकर नगरात घडली आहे. या घटनेनंतर आरोपी पती फरार झाला आहे. सोनीबाई समाधान साळवे (वय 30) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे.
समाधान रमेश साळवे (वय 35, मूळ रा. धारशिरी, ता. धरणगाव. हल्ली रा. खेडी, जळगाव) असे संशयित आरोपीचे नाव आहे. साळवे दांपत्य मोलमजुरीसाठी खेडीत राहायला आलेले होते. मंगळवारी समाधान आणि सोनीबाई यांच्यात कौटुंबिक कारणावरून वाद झाला होता. याच वादाचा राग डोक्यात ठेऊन समाधान याने पहाटे अडीच वाजताच्या सुमारास झोपेत असलेल्या सोनीबाई यांच्या गळ्यावर कुऱ्हाडीने वार करत त्यांची निर्घृण हत्या केली. या घटनेनंतर तो फरार झाला. घटनेची माहिती मिळताच औद्योगिक वसाहत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सकाळी घटनेचा पंचनामा झाल्यानंतर सोनीबाई यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आला. या प्रकरणी संशयित आरोपी समाधान याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
साळवे दाम्पत्याला दोन मुली, एक मुलगा आहे. या घटनेमुळे खेडीत एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. औद्योगिक वसाहत पोलिसांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. संशयित आरोपीच्या अटकेसाठी पथक रवाना झाले आहे.