जळगाव - न्युमोनिया आजाराने ग्रस्त असलेल्या पत्नीचा मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही दुर्दैवी बातमी कळताच जळगावात पतीने गळफास घेत आत्महत्या केली. सोमवारी ही दुर्दैवी घटना घडली. अरुण खंडू सोनवणे (वय ४७, रा. नागसेननगर, रामेश्वर कॉलनी) व पत्नी मीराबाई असे मृत दाम्पत्याचे नाव आहे.
सोनवणे दाम्पत्य मूळचे लाडली येथील रहिवासी-
सोनवणे हे मूळचे धरणगाव तालुक्यातील लाडली येथील रहिवासी होते. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमाली करून ते उदरनिर्वाह करत होते. सोनवणे दाम्पत्यास अनिकेत (वय १९) नावाचा एक मुलगा आहे. काही दिवसांपूर्वी मीराबाई यांना न्युमाेनिया झाल्याचे निदान झाले. जळगावात उपचार केल्यानंतरही प्रकृती सुधारली नाही. अखेर त्यांना मुंबईत हलवण्यात आले. काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू होते. सोबत मुलगा अनिकेत होता. सोनवणे एकटेच घरी होते.
भाऊ घरी गेल्यावर घटना आली समोर-
रविवारी रात्री मीराबाई यांचा मुंबईत मृत्यू झाला. जळगावात सोनवणे एकटेच घरी होते. सोमवारी दुपारी मृतदेह घरी आणल्यानंतर नातेवाईकांच्या उपस्थितीत त्यांना माहिती देण्याचे ठरले होते. मीराबाई यांचा मृतदेह घरी येणार असल्याने सोमवारी सकाळी सोनवणे यांचे भाऊ सुनील हे घरातील सामानाची आवराआवर करण्यासाठी सोनवणे यांच्या घरी गेले. तत्पूर्वीच सोनवणे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.
दाम्पत्यावर एकाच वेळी अंत्यसंस्कार!
सोनवणे यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. सायंकाळी सोनवणे दाम्पत्यावर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.