जळगाव - अपघातग्रस्त रुग्णावर प्राथमिक उपचार करून, जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिल्याने, रुग्णासोबत आलेल्या नातेवाईकांनी शहरातील सहयोग क्रिटीकल केअर सेंटर रुग्णालयात गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आला आहे. यावेळी त्यांनी अतिदक्षता विभागाची तोडफोड करून डॉक्टरांवर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न केला, ही धक्कादायक घटना बुधवारी मध्यरात्री घडली होती. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पारोळा तालुक्यातील विटनेर येथील विनोद भीमराव वानखेडे यांचा बुधवारी रात्री धरणगाव तालुक्यातील चिंचपुरा गावाजवळ अपघात झाला होता. नातेवाईक व काही मीत्र त्यांना घेऊन, शाहू नगरातील सहयोग क्रिटीकल केअर सेंटर या रुग्णालयात आले. तेथे डॉ. विनोद किनगे व डॉ. प्रकाश सुरवाडे यांनी तपासून रुग्णावर प्राथमिक उपचार केले. मात्र रुग्णाची अवस्था गंभीर असल्याने, डॉक्टरांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. रुग्णाला खासगी रुग्णवाहिकेतून सरकारी रुग्णालयात नेत असताना काही जण माघारी फिरले व डॉ. किनगे यांच्यावर संताप व्यक्त करून गोंधळ घातला. दुसरीकडे सरकारी रुग्णालयात विनोद वानखेडे यांना मृत घोषित केल्यानंतर संतापात आणखी भर पडली. नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड करून डॉक्टरांना मारण्याचा प्रयत्न केला.
पोलीस वेळत दाखल झाल्याने अनर्थ टळला
सहयोग क्रिटीकल सेंटरमध्ये तोडफोड होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर आयएमएचे सचिव डॉ.स्नेहल फेगडे, डॉ.राजेश पाटील व सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांना घटनेची माहिती दिली. शहर पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक गणेश बुवा, भूषण जैतकर, स्थानिक गुन्हे शाखेचे नरेंद्र वारुळे व दिनेश बडगुजर यांनी धाव घेऊन घटनेवर नियंत्रण मिळविले. याप्रकरणी पाच जणांंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.