जळगाव - येथील कोविड रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणणारी एक धक्कादायक घटना सोमवारी समोर आली आहे. कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या एका 40 वर्षीय महिलेला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने कोविड रुग्णालयात उपचारासाठी रेफर करण्यात आले होते. मात्र, कोविड रुग्णालयातील डॉक्टरांनी संबंधित पॉझिटिव्ह महिलेला निगेटिव्ह सांगून घरी घेऊन जा, ग्लुकोजचे पाणी द्या, असा अजब सल्ला दिला. नातेवाईक महिलेला घरी घेऊन गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिचा मृत्यू झाला.
मृत्यू झालेली महिला ही जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील रहिवासी होती. तिला 10 सप्टेंबर रोजी श्वास घेण्यास त्रास होत होता. म्हणून नातेवाईकांनी तिला सुरुवातीला जळगावातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्याठिकाणी तिची कोरोनाची अँटीजन चाचणी पॉझिटिव्ह आली होती. म्हणून तिला उपचारासाठी शहरातील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले होते. 12 सप्टेंबर रोजी महिलेची प्रकृती बिघडली. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने तिला कोविड सेंटरमधून कोविड रुग्णालयात रेफर करण्यात आले. कोविड रुग्णालयात आल्यानंतर येथील डॉक्टरांनी तिची कागदपत्रे, तपासणी अहवाल देखील पाहिले नाहीत. ती निगेटिव्ह असल्याचे सांगत डॉक्टरांनी तिला घरी घेऊन जाण्याचा सल्ला नातेवाईकांना दिला. महिलेच्या गळ्यात संसर्ग झाला आहे. तिला ग्लुकोजचे पाणी द्या, असा अजब सल्ला डॉक्टरांनी दिल्याचा महिलेच्या नातेवाईकांचा आरोप आहे. महिलेला घरी घेऊन गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी सकाळी तिचा मृत्यू झाला. या प्रकारानंतर महिलेचे नातेवाईक संतप्त झाले. त्यांनी महिलेचा मृतदेह रुग्णवाहिकेतून कोविड रुग्णालयात आणून डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे संताप व्यक्त केला. या प्रकरणातील दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्याने रुग्णालयात तणाव निर्माण झाला होता.
नातेवाईकांनी घेतली अधिष्ठातांची भेट -
या घटनेनंतर मृत महिलेच्या काही नातेवाईकांनी कोविड रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांची भेट घेऊन दोषींवर कारवाईची मागणी केली. डॉ. रामानंद यांनी नातेवाईकांची समजूत काढून या प्रकरणाच्या चौकशीचे आश्वासन दिले. त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार केले. दरम्यान, या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीवेळी डॉक्टरांनी सारवासारव केली. महिला कोरोना पॉझिटिव्ह होती. परंतु, तिच्यात सौम्य लक्षणे असल्याने शिवाय रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने तिला घरी पाठवले होते, अशी माहिती डॉक्टरांनी दिल्याची माहिती आहे.
दरम्यान, या प्रकरणासंदर्भात कोविड रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, एखादा रुग्ण पॉझिटिव्ह असताना कोणी डॉक्टर कशाला निगेटिव्ह सांगणार आहे. रुग्णालयात एखाद्या वेळी बेड रिकामा नसला म्हणून आम्ही रुग्णांची परिस्थिती बघून निर्णय घेत असतो. गंभीर रुग्णांसाठी आपत्कालीन स्थितीत कक्ष एकमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. या प्रकरणात कागदपत्रे काहीच नाही, तरीही या प्रकरणाची चौकशी करू. नातेवाईकांनी भेट घेतली, त्यांनाही चौकशीचे आश्वासन दिले आहे, असे डॉ. जयप्रकाश रामानंद म्हणाले.
हेही वाचा - 'फडणवीसांनी खडसेंच्या रुपाने उत्तर महाराष्ट्रातील ओबीसी नेता संपवला'
हेही वाचा - भुसावळात धारदार शस्त्राने युवकाचा खून