जळगाव - मागील आठवड्यापासून शहरासह जिल्ह्यात उष्णतेची लाट आली आहे. शहरात या उन्हाळ्यातील सर्वोच्च ४६ अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली आहे. यावर्षी एप्रिलमध्येच तापमानाने उच्चांक गाठल्याने जळगावकरांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
मध्यंतरी अवकाळीचे वातावरण असल्याने जिल्ह्यातील तापमानात मोठी घट झाली होती. जिल्ह्यातील तापमान ३७ ते ३८ अंश सेल्सिअस इतके खाली आले होते. मात्र, आता पुन्हा तापमानात वाढ झाली आहे. येत्या काही दिवसात जिल्ह्यातील तापमान अजून वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या आठवडाभरापासून तापमानात ७ ते ८ अंशांनी वाढ झाली आहे. वाढत्या उकाड्याने जळगावकर त्रस्त झाले आहेत. सकाळी १० वाजल्यानंतर उन्हाचा कडाका वाढत आहे. वाढत्या उन्हामुळे जळगावकरांना आपली दैनंदिन कामे सकाळीच आटोपून घ्यावी लागत आहेत. अगदी अपवादात्मक परिस्थितीतच नागरिक घराबाहेर पडत असल्याचे दिसून येत आहे.
सकाळी १० वाजता ४० ते ४२ अंशांपेक्षा अधिक तापमान नोंदवले जात आहे. दुपारी १ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सर्वाधिक तापमान दिसून येत आहे. दरवर्षी साधारणपणे मे महिन्यात जळगावातील तापमान ४५ अंशांपेक्षा अधिक असते. परंतु, यावर्षी पूर्वेकडून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे एप्रिल महिन्यातच तापमानाचा पारा ४६ अंशांवर गेला आहे.