जळगाव - जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील उत्राण गावासह परिसरात शुक्रवारी दुपारी दीड ते दोन तास कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे गावात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. सर्वत्र ढगफुटी झाल्याची चर्चा आहे. जिल्हा प्रशासनाने मात्र, यासंदर्भात अधिकृत माहिती दिलेली नाही.
उत्राण गावासह परिसरात शुक्रवारी दुपारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला. दीड ते दोन तास झालेल्या पावसामुळे गावात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. गावाच्या परिसरातील नाले खळखळून वाहत होते. यावेळी नाल्याला आलेल्या पुराचे पाणी गावातील एका खासगी कंपनीत घुसल्याने कंपनीतील प्लॅस्टिकचे ड्रम पाण्यात वाहून गेले. पुराच्या पाण्यात तरंगणाऱ्या प्लॅस्टिकच्या ड्रमवर बसून गावातील शाळकरी मुलांनी नौकानयनाचा मनस्वी आनंद देखील लुटला.
या जोरदार पावसामुळे गावातील शेतकऱ्यांनी पेरणी केलेले बियाणे देखील पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मात्र मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. अनेक शेतकऱ्यांनी भर उन्हाळ्यात पाण्याचा बंदोबस्त करून पूर्वहंगामी कापूस लागवड केली होती. मात्र, मुसळधार पावसामुळे पूर्वहंगामी कापसाचे नुकसान झाले आहे. गावातील अनेक घरांचे देखील या पावसामुळे नुकसान झाले आहे. अनेक घरांची पडझड झाली आहे. शासनाने या परिसरातील नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत घ्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते आहे.