जळगाव - चाळीसगाव, भडगाव आणि पाचोरा या तीन तालुक्यांना अतिवृष्टीचा जबर तडाखा बसला आहे. या तिन्ही तालुक्यातील 38 गावे पुराच्या पाण्यामुळे बाधित झाली असून, या गावांमध्ये 675 घरांची पडझड झाली आहे. तर 661 लहान-मोठ्या जनावरांची हानी झाली आहे. 300 दुकानांमध्ये पाणी घुसून मालाचे नुकसान झाले आहे. यात सर्वाधिक फटका चाळीसगाव तालुक्याला बसला असून, महसूल प्रशासनाने नुकसानीचा प्राथमिक अहवाल तातडीने राज्य सरकारला पाठवला आहे. आज (मंगळवारी) रात्री अहवाल निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांनी हा अहवाल आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मदत व पुनर्वसन मंत्रालयाला सादर केला आहे.
चाळीसगाव तालुक्यात सर्वाधिक नुकसान -
कन्नड घाटासह पाटणादेवी परिसरात सोमवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे तितूर, डोंगरी आणि गिरणा नदीला मंगळवारी पहाटे पूर आला. या पुरामुळे चाळीसगाव शहरासह वाकडी, वाघडू, हिंगोणे, खेर्डे, मुंदखेडे खुर्द, रोकडे, बोरखेडा खुर्द, पातोंडा, ओझर, टाकळी प्र.चा. ही गावे पुरामुळे बाधित झाली आहेत. या सर्व गावांमधील शेकडो गुरे व वाहने पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने नुकसान झाले आहे. चाळीसगाव शहरातील सखल भागातील अंदाजे 50 ते 60 घरांमध्ये पाणी शिरले आहे. चाळीसगाव शहरात ज्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. तेथील लोकांची तात्पुरती व्यवस्था एबी हायस्कूल व उर्दू हायस्कूलमध्ये करण्यात आलेली आहे. तसेच त्यांच्या जेवणाची व्यवस्था चाळीसगाव नगरपालिकेतर्फे करण्यात आलेली आहे. दरम्यान, पुरामुळे एकट्या चाळीसगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या तालुक्यातील 32 गावे बाधित असून, त्याठिकाणी 155 लहान तर 506 मोठ्या पशूंची हानी झाली आहे. एका 60 वर्षीय वृद्धेचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे, 617 घरांची अंशतः तर 20 घरांची पूर्णपणे पडझड झाली आहे. 300 दुकानांचेही नुकसान झाले आहे.
भडगाव-पाचोरा तालुक्यातही नुकसान -
चाळीसगाव तालुक्यासह भडगाव तालुक्यातील 2 तर पाचोरा तालुक्यातील 4 गावे पुरामुळे बाधित आहेत. भडगावात 14 घरांची पडझड झाली आहे. पाचोरा तालुक्यातही 24 घरांचे नुकसान झाले आहे. या दोन्ही तालुक्यातील शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकरी हवालदिल झाले आहेत. चाळीसगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे 15 हजार 915 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.
कन्नड घाटात मदतकार्य सुरूच -
31 रोजी पहाटे 2 ते 3 वाजेदरम्यान अतिवृष्टीमुळे कन्नड घाटात ठिकठिकाणी दरड कोसळली आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. अनेक वाहने दगड-मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकली आहेत. झाडांची रस्त्यावर पडझड झाली आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळपासून वाहतूक सुरळीत करण्यासाठी धुळ्यातील एसडीआरएफचे पथक कार्यरत आहे. घाटातील वाहतूक पूर्ववत होण्यास 24 तासांचा अवधी लागू शकतो, असे यंत्रणेकडून सांगण्यात आले आहे.
सविस्तर अहवाल लवकरच सादर होणार -
निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांनी राज्य सरकारला सादर केलेल्या अहवालातील आकडेवारी ही प्राथमिक स्वरुपाची असून, सविस्तर माहिती घेण्याचे काम चालू आहे. पुढील सविस्तर अहवाल लवकरच सादर केला जाणार आहे.
हेही वाचा - महाराष्ट्रात राजकीय काला : दहीहंडी, आगामी सणांवरुन राज्य सरकार-विरोधक संघर्ष पेटणार?