जळगाव - गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. सोमवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास जळगाव शहरासह तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. गतवर्षीच्या तुलनेत महिनाभर उशिराने हजेरी लावूनही पावसाने मागील वर्षीची आजपर्यंतची सरासरी ओलांडली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या सुमारे ५० टक्के पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी हीच सरासरी ३८ टक्क्यांपर्यंत होती.
जळगाव शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले होते. शहरातील नवीपेठ, गणेश कॉलनी, मेहरूण, न्यू बी. जे. मार्केट, जुने जळगाव परिसरातील सखल भागात २ ते ३ फुटांपर्यंत पाणी साचले होते. मागील वर्षी आजच्या तारखेला जिल्ह्यात सरासरी ३८.९ टक्के पाऊस झाला होता. मात्र, यावर्षी पावसाचे आगमन उशिरा होऊनही जोरदार हजेरी लावल्याने पावसाने ही सरासरी ओलांडली आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी ५० टक्के पाऊस झाला आहे. जामनेर तालुक्यात सर्वाधिक ६५.४ टक्के पाऊस झाला आहे. मागील वर्षी आजच्या तारखेपर्यंत केवळ ३० टक्केच पाऊस जामनेर तालुक्यात झाला होता. तर एरंडोल ५३.४ टक्के, भुसावळ ५१.२, मुक्ताईनगर ५७.०० टक्के आणि पाचोरा तालुक्यात ५०.२ टक्के पाऊस झाला आहे. उर्वरीत सर्व तालुक्यात ३९ टक्क्यांच्यावर पाऊस झाला आहे. जळगाव तालुक्यात ४२.९ टक्के पाऊस झाला आहे. जळगाव तालुक्यात मागील वर्षी केवळ ३६.६ टक्के पाऊस झाला होता.
हतनूर, गिरणा व वाघूर या तीन मोठ्या प्रकल्पांवर जिल्ह्यातील अनेक शहरांसह गावांचाही पाणीपुरवठा अवलंबून आहे. या प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा मे अखेरीस शून्य टक्क्यांवर पोहोचला होता. तर वाघूरमध्ये जेमतेम ९ टक्के पाणीसाठा उरला होता. मात्र, प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात आता झालेल्या दमदार पावसामुळे या मोठ्या प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे हतनूरमध्ये १९.१४ टक्के, गिरणा १२.८२ टक्के तर वाघूरमध्ये २९.८६ टक्के असा एकूण सरासरी १८.५१ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट दूर झाले आहे.