जळगाव (बोदवड) - तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे मनूर बुद्रुक, नाडगाव, कुऱ्हा हरदो, शेवगे आदी गावांच्या शिवारातील केळी, ऊस, कपाशी व पपई या पिकांचे अतोनात नुकसान झाले. या पावसाने मनूर बुद्रुक येथील जिजाबाई खेलवाडे यांच्या १.४७ हेक्टर क्षेत्रातील केळी झाडे उन्मळून पडली. तसेच मुरलीधर डिके, मनीषा देवकर यांच्या शेतातील केळी जमीनदोस्त झाली आहे.
तालुक्यातील नाडगाव येथील एकनाथ धांडे यांच्या उजनी शिवारातील एक हेक्टरवरील ऊस पीक जमीनदोस्त झाले. तर सोनोटी शिवारातील कल्पना धांडे यांच्या एक हेक्टरमधील ऊस पिकाचे नुकसान झाले. कुऱ्हा, हरदो, व शेवगे येथील केळी, पपई व कपाशीचे अतोनात नुकसान झाले आहे.
तहसीलदार हेमंत पाटील यांनी कृषी विभागाशी संपर्क साधून नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. तलाठी आर. व्ही. उगले, पोलीस पाटील रवींद्र खेलवाडे, शेतकरी विकास देवकर, शामराव पाटील, प्रल्हाद डिके, मुरलीधर डिके, विलास पाटील, कोतवाल यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली. शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई त्वरित मिळण्याची मागणी केली आहे.