जळगाव - येणार येणार म्हणत हुलकावणी देणाऱ्या वरुणराजाने अखेर जळगाव शहरात बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास जोरदार हजेरी लावली. सुमारे तासभर वादळी पाऊस झाला. या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला.
बुधवारी सकाळपासून जळगाव शहरात मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत होता. सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास आकाशात ढग जमून आले. त्यानंतर साडेसहा वाजताच्या सुमारास वादळासह आनंदसरी बरसल्या. तासभर मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले होते. अचानक आलेल्या पावसामुळे व्यावसायिकांसह नागरिकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली.
दरम्यान, जोरदार पावसामुळे शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. अमृत योजनेमुळे शहरातील कॉलन्या तसेच उपनगरांमध्ये रस्ते खोदण्यात आलेले आहेत. अनेक ठिकाणी अमृत योजनेच्या जलवाहिनीचे पाईप टाकल्यानंतर रस्त्यांच्या पॅच वर्कची कामे झालेली नाहीत. पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे.